Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
MNS vs Shiv Sena : 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर मनसेची की ठाकरेंच्या शिवसेनेची सभा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर (Shivtirth) मनसेची (MNS) सभा होणार की ठाकरेंच्या शिवसेनेची (Shiv Sena UBT) सभा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. मनसे पक्षाकडून महापालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळावी, यासाठी आधी पत्र गेल्याने नियमानुसार आम्हाला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तर 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतिदिन असल्याने हजारो लाखो शिवसैनिक राज्यभरातून शिवाजी पार्कवर येतात. त्यामुळे शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाला परवानगी मिळावी आणि आता इतर कुठल्याही पक्षाला परवानगी मिळू नये, अशा प्रकारची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार?
यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतील संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला होता. आता 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगर विकास विभागाकडून या संदर्भातला निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज दुपारपर्यंत मुंबई महापालिकेकडे परवानगी संदर्भातील पत्र प्राप्त होणार असल्याचेही समजते. मनसेला अद्याप परवानगी पत्र मिळालेले नाही. तर दुसरीकडे 17 नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाची बीकेसी मैदानावर नियोजित सभा होणार आहे. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर जर परवानगी मिळाली तर बीकेसीची सभा घ्यायची की नाही? याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आता शिवाजी पार्कवर राज ठाकरे की उद्धव ठाकरे? कुणाची तोफ धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंचा बीड दौरा रद्द
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज्यभर दौरे करत आहेत. आज ते बीड दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा बीड दौरा रद्द करण्यात आला आहे.
आणखी वाचा