PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
PM Modi Speech : पंतप्रधान मोदींनी युवक आणि ऊर्जा संकटासंबंधीच्या घोषणांसह अनेक मोठ्या घोषणा केल्यात. पंतप्रधानांच्या संबोधनात त्यांनी कोणत्या 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, हे जाणून घेऊया.

Independence Day 2026 PM Modi Speech : देश आज आपला 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech) यांनी प्रथेप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची ही 13 वी वेळ आहे. 2014 मध्ये, जेव्हा ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी देशाला पहिल्यांदा संबोधित केले होतं. (Independence Day 2026)
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी यावेळी देशाला संबोधित करताना आगामी काळातील भारताच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. (PM Modi speech at Red Fort) तसेच आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी युवक आणि ऊर्जा संकटासंबंधीच्या घोषणांसह अनेक मोठ्या घोषणा केल्यात. पंतप्रधानांच्या संबोधनात त्यांनी कोणत्या 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, हे जाणून घेऊया. (Independence Day 2026 PM Modi Speech)
1) युवकांसाठी एआय कौशल्य प्रशिक्षण
पंतप्रधान मोदींनी युवकांना एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही नुकतेच 'एआय इम्पॅक्ट समिट' आयोजित केले होते. एआय वेगाने पसरत आहे. लाल किल्ल्यावरून मला देशातील युवकांसाठी एक घोषणा करायची आहे, आम्ही पुढील वर्षभरात 1 कोटी युवकांना एआय कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आपल्या युवकांमध्ये एआयच्या जगात नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण होईल."
2) मोफत ऑनलाइन कोचिंग
पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोचिंग क्लासेसची स्पर्धा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठे ओझे बनली आहे. प्रत्येक पालकाला वाटते की, जर त्यांनी आपल्या मुलाला कोचिंग सेंटरमध्ये पाठवले नाही, तर ते कुठेतरी मागे पडतील किंवा त्यांना चांगल्या कुटुंबातील मानले जाणार नाही." गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या चिंता लक्षात घेऊन, आम्हाला कोचिंगवर खर्च होणारे हजारो कोटी रुपये वाचवायचे आहेत. आमचे तरुण त्यांच्या कुटुंबांच्या जवळ राहू शकतील, त्यांची काळजी घेतली जाईल आणि ते अतिरिक्त आर्थिक भार टाळू शकतील. म्हणूनच, आम्ही आमच्या तरुणांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता मोफत ऑनलाइन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि अत्यंत प्रतिभावान शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ आहेत. ही संसाधने एकत्र आणून, आम्ही देशातील तरुणांना मोफत कोचिंग देऊ आणि या उद्देशासाठी एक संपूर्ण नेटवर्क तयार करू.
3) नागरी सुरक्षेत सुधारणा
वाढत्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण आणि वाढीव क्षमता.
4) क्रीडा प्रतिभा शोध मोहीम
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही 2026 मध्ये भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे. परंतु 2026 हे वर्ष डोळ्यासमोर ठेवून, आम्ही त्या सर्व खेळांवर लक्ष केंद्रित करू ज्यात भारत आज सहभागी होत नाही, ज्यात भारत पात्र ठरू शकत नाही आणि जे खेळ आतापर्यंत दुर्लक्षित राहिले आहेत. जिथे क्रीडा जगतातील जवळपास तीन-चतुर्थांश खेळाडू आपली वाट पाहत आहेत." भारत आता त्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या उद्देशाने एक प्रतिभा शोध मोहीम आयोजित केली जाईल.
5) सेमीकंडक्टर
पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला सेमीकंडक्टरचे उदाहरण देतो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जगभरात सेमीकंडक्टरवर चर्चा झाली. आपल्या देशातही त्यावर चर्चा झाली, पण आपण कोणतीही मोठी सेमीकंडक्टर योजना पुढे नेऊ शकलो नाही. आणि आजची परिस्थिती काय आहे? आजच्या डिजिटल जगात आणि तंत्रज्ञानाच्या युगात, आपल्याला चिप्सचे महत्त्व समजते. इलेक्ट्रॉनिक्स असो, वैद्यकीय उपकरणे असोत किंवा वाहतूक व्यवस्था असो—प्रत्येक गोष्टीत चिप्स आवश्यक आहेत. आणि त्यामुळे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की या चिप्सशिवाय जग ठप्प होऊ शकते.
आत्मनिर्भरतेच्या मार्गावर पुढे जात, भारताने आपली सेमीकंडक्टर योजना सुरू केली आहे—एक मोठी सेमीकंडक्टर योजना. तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांवर काम आधीच सुरू झाले आहे. आणि मला सांगण्यात आले आहे की तेथील उत्पादनाची निर्यातही सुरू झाली आहे!" आणि मला माझ्या देशवासियांना कळवायचे आहे की पुढील 7 ते 8 वर्षांत, आणखी 7-8 सेमीकंडक्टर प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
6) अणुऊर्जा
पंतप्रधान मोदी म्हणाले, "बारा वर्षांपूर्वी देशाची सौर ऊर्जा क्षमता केवळ 2 गिगावॅट होती. फक्त 2 गिगावॅट! आज आम्ही 160 गिगावॅटचे लक्ष्य गाठले आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मला तुम्हाला आणखी एक माहिती द्यायची आहे. याचा लाभ मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचावा, याकडेही आम्ही तितकेच लक्ष दिले आहे. आम्ही 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' सुरू केली आणि आज मला आनंद होत आहे की, इतक्या कमी वेळात आम्ही 50 लाख घरांनी सौर ऊर्जा स्वीकारण्याचा टप्पा ओलांडला आहे आणि हे काम वेगाने पुढे जात आहे."
7) अमली पदार्थमुक्त भारताचे आवाहन
पंतप्रधान मोदींनी नागरिकांना अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात पुढे येण्याचे आवाहनही केले. अमली पदार्थमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट होता: राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र हिंसाचाराचा सामना करण्यापुरती मर्यादित नाही. तरुणांना अमली पदार्थांच्या गैरवापरापासून आणि हिंसाचारापासून दूर ठेवणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
8) जनगणनेसंदर्भात देशाला एक महत्त्वाचे आवाहन
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनगणनेसंदर्भात देशाला एक महत्त्वाचे आवाहन केले. जनगणना हा देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. आता लोक स्वतः अर्ज भरून मोबाईल फोनद्वारे अपलोड करू शकतात, असेही ते म्हणाले. लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विकसित भारताच्या दूरदृष्टीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून म्हणाले, "मी तुमच्या सहकार्याची विनंती करतो. जनगणनेचे काम सुरू आहे. त्यातील तपशील धोरणे ठरवतात. अचूक माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. या वेळी आम्ही ठरवले आहे की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने तुमची माहिती डिजिटल स्वरूपात सादर करावी. यामुळे देशाच्या प्रगतीला मदत होईल."
ते म्हणाले, "कृपया संपूर्ण अर्ज समजून घ्या आणि तो डिजिटल स्वरूपात अपलोड करा. जनगणनेच्या कामात तुमच्याशी जोडले जाण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. देशाचे हित तुमच्या हितापेक्षा वरचढ असले पाहिजे. वेळ आपली आहे, संधी आपली आहे, निर्धार आपला आहे. प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने टाका, आमच्यासोबत टप्प्याटप्प्याने सामील व्हा."
9) नवीन नियम तयार केले पाहिजेत - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्याला येणाऱ्या काळाला अनुरूप धोरणे आणि नियम तयार केले पाहिजेत." ते पुढे म्हणाले, "भारताला स्थिर राजकीय जनादेश, स्थिर सरकार, चैतन्यशील लोकशाही, मजबूत न्यायपालिका आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे संविधान लाभले आहे. आम्ही नुकतेच केलेले व्यापारी करार आपल्यासाठी एक मोठी संधी आहे. मला आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सांगायचे आहे की, आपण ही संधी गमावू नये."
10) लघू-मध्यम उद्योगांना आव्हान
लघू-मध्यम उद्योगांना आव्हान करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी लघू-मध्यम उद्योगांना आव्हान करतो, आपल्याला ही संधी सोडायची नाही. भारताची उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पोहोचवायची आहेत. त्यासाठी वैश्विक निकष आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या दर्जेदार आणि स्वस्त उत्पादने द्यावी लागतील, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















