PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात भारताच्या आगामी काळातील विकासाचा रोडमॅप सादर केला. त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

PM Modi Independence Day speech: या शतकातील 25 वर्षे सरली आहे. आता येणारी 25 वर्षे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आता आपण थांबू शकत नाही, आपली दिशा ठरली आहे. आपली गती थांबू शकत नाही. आपल्याला ठरलेले ध्येय प्राप्त करायचे आहे, त्यासाठी आपल्याला आपले वर्क कल्चर बदलावे लागेल. आपले विचार बदलावे लागतील. आपल्या कामाची गती बदलली पाहिजे. जे काम गेल्या पाच-सात दशकांमध्ये झाले नाही, ते आपल्याला पुढील पाच-सात वर्षांत करायचे आहे. मला देशातील युवाशक्तीवर विश्वास आहे. आपल्या सर्वच क्षेत्रात सुधारणांची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले. ते शनिवारी भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) लाल किल्ल्यावरुन बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी आगामी काळातील भारताच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. (PM Modi speech at Red Fort)
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आगामी काळात भारताच्या विकासासाठी सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जा आणि इंधन कसे महत्त्वाचे आहे आणि त्यादृष्टीने भारत काय करत आहे, याबद्दल सविस्तर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेमीकंडक्टरच्या चर्चा व्हायच्या. पण आपण देशात सेमीकंडक्टरचा कारखाना उभारु शकलो नाही. आजच्या डिजिटल युगात आपल्या चीपचे महत्त्व माहिती आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी चीप अनिवार्य आहे. त्याशिवाय जग थांबेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा सेमीकंडक्टर कारखाना सुरु झाला आहे. त्याठिकाणी तयार झालेल्या उत्पादनाची निर्यात सुरु झाली, हे मला सांगण्यात आले आहे. येत्या सात-आठ वर्षात आणखी पाच ते सात सेमीकंडक्टर प्रकल्प देशभरात सुरु करु, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
सध्या ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे आपल्या चीप, एआय, डेटा सेंटर असो यासाठी आपल्या वीजेची मोठी गरज आहे. ऊर्जा सुरक्षा ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण महत्त्वाची पावले टाकली आहे. अणुउर्जा हा उर्जेचा मोठा स्रोत आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट उर्जानिर्मितीचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पुढील दशकात पाच नवीन न्युक्लिअर रिअॅक्टर सुरु करण्याचे लक्ष्य आहे. यावर्षी भारताने फास्ट ब्रीडर न्युक्लिअर तंत्रज्ञानात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अणुउर्जेत आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने आपण महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
PM Modi on fuel: आपण समुद्रातील 99 टक्के क्षेत्र खुले केले आहे, तेल उत्खननात भारत प्रगती करणार: मोदी
स्रोतांच्या कमतरतेमुळे देश कधीच थांबत नाही. देश थांबण्याचे कारण संकुचित विचार आहे. विचार एका मर्यादेत बांधले जातात, सडतात, तेव्हा आपल्याला आपल्या सामर्थ्याचा विसर पडतो. आज देशाला कच्च्या तेलासाठी अवलंबून राहावे लागत आहे. ते आपल्या चुकीच्या विचारामुळे आहे. आपण समुद्रकिनाऱ्याचा 90 टक्के हिस्सा, नो गो एरिया घोषित केला होता, तिकडे तेल उत्खनन न करण्याचे धोरण ठरवले होते. हे वैचारिक दारिद्य्र होते. आम्ही निर्णय घेतला, असे चालणार नाही. आम्ही 99 टक्के क्षेत्र गो अहेड क्षेत्र म्हणून खुले केले. त्यामुळे आता आपण या भागात तेल उत्खनन करत आहोत. त्यासाठी आपण समुद्र मंथन योजनेची घोषणा केली आहे.
आपल्याला उर्जेचे पर्यायी स्रोतही शोधले पाहिजेत. 2014 पूर्वी भारतात फक्त 70 शहरांत पाईप गॅस व्यवस्था होती. गेल्या 12 वर्षात आपण 700 शहरांमध्ये पाईप गॅस पोहोचवला आहे. हा असतो वेग, हा असतो विस्तार. 2014 पूर्वी 22 लाख घरात पाईप गॅस पोहोचत आहोत, आज पावणेदोन कोटी घरात पाईपने गॅस पोहोचवला जात आहे. 12 वर्षांपूर्वी देशात सौरउर्जेची क्षमता फक्त 2 गिगावॅट होती. आज 160 गिगावॅट क्षमता झाली आहे. आम्ही याचा लाभ मध्यमवर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज 50 लाख घरांमध्ये सौरउर्जा गेली आहे. हजारो घरांमध्ये वीजेची बचत होऊन ते ही वीज विकत आहेत. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 80 हजारांची मदत केली जात आहे.
रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम देशात 1925 सुरु झाले. पण 90 वर्षात फक्त 30 टक्के रेल्वेचे विद्युतीकरण झाले. आपला वेग बघा. आम्ही गेल्या दहा वर्षात 100 टक्के रेल्वेचे विद्युतीकरण केले. हे असते काम. त्यामुळे बाहेरून आणाव्या लागणाऱ्या डिझेलची बचत झाली, पर्यावरणाचा फायदा झाला. आपण एवढ्यावरच थांबलो नाही. आपण हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरु केली आहे. आपण एकापाठोपाठ ध्येय गाठत आहोत.
PM Modi Speech: आत्मनिर्भर भारताच्या धोरणामुळे आपला देश वाचला: मोदी
गेल्या 10-12 वर्षात देशाने अनेक संकटांचा सामना केला. कोरोनाने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले होते. कोरोनातून बाहेर निघाल्यावर युद्धामुळे तणाव निर्माण झाला. त्यावेळी अनेक भविष्यवेत्त्यांनी काय-काय म्हटले होते, देशाला घाबरवणे, चिंतेत ठेवणे, यातच काहीजणांना आनंद मिळतो. कोरोना लस मिळणार नाही, कोविडमध्ये लोक वाचणार नाहीत, आखाती युद्धामुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, खते मिळणार नाहीत, अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र, देशाने पाहिले की, गेल्या 12 वर्षातील योजनांचा फायदा आता होत आहे. इतक्या मोठ्या संकटानंतरही भारताने केलेली तयारी आणि निर्णयांमुळे फायदा झाला. आज देशात पेट्रोल, गॅस, युरिआ सगळे काही आहे. आपण आपल्या ताकदीवर चालत आहोत. या संकटांचा प्रभाव सगळ्यांवर झाला. जगात युरियाची एक गोणी 3000 रुपयांना मिळते. पण आपल्या देशातील शेतकऱ्यांना तीच गोणी फक्त 300 रुपयांत मिळते.
मी आत्मनिर्भर भारताविषयी बोलायचो तेव्हा काही लोक एअर कंडिशन केबिनमध्ये बसून जागतिकीकरणाबद्दल बोलायचे. पण गेल्या दशकभरात जागतिकीकरण ही संकल्पना लोप पावत चालली आहे. प्रत्येक देश आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पातळीवर शोधत आहे. पण या संकटाच्या काळात काही लोकांनी स्रोतांचा शस्त्रासारखा वापर केला. संपूर्ण जग पेट्रोल, डिझेल, औषधे, खते, चीप्स अशा गोष्टींचा शस्त्रासारखा वापर करत आहे. अशा काळात आपण आत्ननिर्भर होण्याच्या धोरणामुळे टिकून आहोत. आज भारत हा जगासाठी स्वीकृत आणि सन्माननीय देश आहे. भारतामध्ये स्थिर सरकार, मजबूत न्यायव्यवस्था आणि संविधान आहे. जगाला भारताच्या या सामर्थ्याचा परिचय झाला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
जे व्यापारी करार झाले आहेत, ती खूप मोठी संधी आहे. मी लघू-मध्यम उद्योगांना आव्हान करतो, आपल्याला ही संधी सोडायची नाही. भारताची उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पोहोचवायची आहेत. त्यासाठी वैश्विक निकष आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या दर्जेदार आणि स्वस्त उत्पादने द्यावी लागतील, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
आणखी वाचा
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















