PM Modi Rozgar Mela: सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार 'मिशन मोड'वर; पंतप्रधानांचे प्रतिपादन, 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप
PM Modi Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन 'रोजगार मेळाव्यात' 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. सरकारी देण्यासाठी सरकार मिशन मोडवर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
PM Modi Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) युवकांना रोजगार मेळाव्यात (Rozgar Mela) मोठे गिफ्ट दिले. पंतप्रधान मोदी यांनी रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवली. या रोजगार मेळाव्यात 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तुम्ही देशाचे 'सारथी' असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युवकांना म्हटले.
रोजगार मेळाव्यात युवकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, तुम्हाला ही नवीन जबाबदारी एका खास टप्प्यात मिळत आहे. देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. या कालावधीत देशातील नागरिकांनी भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून तयार करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही देशाचे 'सारथी' होत असल्याचे त्यांनी म्हटले. आजचा विशाल रोजगार मेळावा पाहून तुम्हाला लक्षात येईल की सरकार युवकांना सरकारी नोकरी देण्यासाठी 'मिशन मोड'वर काम करत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, देशातील जनतेसमोर तुम्ही आज नवीन जबाबदारी स्वीकारत आहात. तुम्ही एक प्रकारे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहात, असेही मोदी यांनी म्हटले.
कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान जगभरातील युवकांसमोर नवीन संधींचे संकट आहे. विकसित देशांवरही संकटाची गडद छाया आहे. अशा कठीण परिस्थितीत अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी भारताजवळ आर्थिक क्षमता दाखवून देण्यासाठी आणि नवीन संधी निर्माण करण्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे म्हटले आहे. स्टार्ट-अप्सपासून ते स्वयंरोजगारापर्यंत, अंतराळ विज्ञान ते ड्रोन क्षेत्रात भारतात युवकांसाठी चहुबाजूने नवीन संधी निर्माण होत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी 'कर्मयोगी भारत' टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म लाँच केला. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले यामध्ये काही ऑनलाइन कोर्सेसदेखील आहेत. या कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. भविष्यात करिअरच्यादृष्टीने विद्यार्थ्यांना फायदा होईल असेही पंतप्रधानांनी म्हटले.
पंतप्रधानांनी ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळावा सुरू केला होता. तेव्हा पहिल्या टप्प्यात 75 हजार युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. देशभरातील 45 विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरात यांना वगळण्यात आले होते. शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरा मेडिकल पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: