Congress MPs Suspended : खासदारांच्या निलंबनाची लाट सुरूच; लोकसभेतून आणखी 3 खासदार निलंबित, आतापर्यंत 146 खासदारांवर कारवाई
Parliament MP Suspensions : लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या आणखी तीन खासदारांचे निलंबन केले आहे. आतापर्यंत एकूण 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
Opposition MPs Suspended : लोकसभेतून आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात ( Lok Sabha Speaker Suspends three MP) आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार नकुलनाथ (Nakulnath), डीके सुरेश (D K Suresh) आणि दीपक बैज (Deepak Baij) यांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. आता, निलंबित खासदारांची संख्या 146 वर पोहचली आहे. यामध्ये लोकसभेच्या 100 खासदारांचा समावेश आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यानंतर तीन खासदारांची नावे घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत आहात, घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
लोकसभा अध्यक्षांनी आणखी काय म्हटले?
घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांवर लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचे नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्हाला इथे चर्चा करण्याचा आणि तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा, मी तुम्हाला शून्य तासात तुमचे मत मांडण्याची संधी देईन. ही पद्धत योग्य आहे का? हीच सभागृहाची प्रतिष्ठा आहे का? (सदस्य) नियोजित पद्धतीने निलंबित करण्याबाबत बोलत आहेत, हे योग्य नसल्याचेही लोकसभा अध्यक्षांनी म्हटले.
संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर 14 डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली.
13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेतील एक मोठी त्रुटी समोर आली. लोकसभेतील दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून जमिनीवर उडी मारली आणि घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलक तरुणांनी स्मोक स्टिक फोडल्या. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत किती जणांचे निलंबन?
सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 14 डिसेंबर रोजी विरोधी बाकांवरील 13 खासदार, 18 डिसेंबर रोदी 33 खासदार, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 45 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
नियोजित वेळापत्रकानुसार संसदेचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, गुरुवारीच अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.