भारताने शांतता चर्चा रद्द केल्याने पाक पंतप्रधानांचा थयथयाट
दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मी केलेल्या प्रयत्न भारताने दिलेलं अंहकारी आणि नकारात्मक उत्तराने मी निराश झालो आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानसोबतची शांतता चर्चा रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर थयथयाट केला. भारतात मोठ्या पदावर छोटी माणसे बसल्याचा पोकळ आरोप इम्रान खान यांनी केला. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भारतीय जवानांच्या अपमानामुळे भारताने ही नियोजित चर्चा रद्द केली होती.
भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चा रद्द झाल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना भारताने दिलेल्या अंहकारी आणि नकारात्मक उत्तराने मी निराश झालो आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं.
इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटलं की, "दोन्ही देशांच्या शांतीसाठीची नियोजित चर्चा भारताने रद्द केल्याने मी निराश आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक छोट्या लोकांना भेटलो आहे, जे विविध कार्यालयांमध्ये मोठ्या पदांवर बसले आहेत. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे."
म्हणून भारताकडून नियोजित चर्चा रद्द?
जम्मू काश्मिरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने सोनपतमधील जवान नरेंद्र यांच्या मृतदेहाची विटंबना केली. पाक सैन्याने नरेंद्र यांचं शिर कापून हत्या केली. पाकिस्तानच्या या दुतोंडीपणामुळे भारताने आयोजित चर्चा फेटाळून लावली.
दुसरीकडे, जम्मू काश्मिरच्या शोपियानमधून अपहरण केलेल्या तीनही पोलिस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. अतिरेक्यांनी चार पोलिस कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं होतं. त्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाला अतिरेक्यांनी सोडून दिलं. मात्र अन्य तिघा पोलिस कर्मचाऱ्यांची अतिरेक्यांनी हत्या केली.
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा अवघ्या काही दिवसातच जगासमोर आला, असं भारताने म्हटलं. पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही गृहमंत्रालयाकडून ठणकावून सांगितलं आहे.