(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप आता दक्षिणेकडील राज्यांकडे वळलाय, ईडी कारवाईवरुन शरद पवारांनी साधला निशाणा
ED Raids : विरोधीपक्षातील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर ईडीच्या कारवाईचे प्रमाण वाढलेय, असे वक्तव्य शरद पवार यांनी केलेय.
Tamil Nadu Minister ED Raids : तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही सेंथिल बालाजी (Thiru V Senthil Balaji) यांच्या सचिवालयात आणि इतर ठिकाणी आज ईडीने छापेमारी केली. बालाजी यांच्याविरोधात झालेल्या या कारवाईचा विरोधी पक्षाने जाहीर निषेध व्यक्त केला. त्याशिवाय केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, केजरीवाल यांच्यासह अनेकांनी भाजपवर निशाणा साधला.
शरद पवार काय म्हणाले ?
विरोधीपक्षातील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर ईडीच्या कारवाईचे प्रमाण वाढलेय. तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या कार्यालयावर ईडीने टाकलेल्या धाडीचा निषेध व्यक्त करतोय, असे ट्वीट शरद पवार यांनी केलेय. केंद्र सरकारच्या विरोधात उभा राहत असलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न ईडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात उठलेला आवाज दाबण्याच्या उद्देशाने ईडी आता दक्षिणेकडील राज्यांमध्ये पोहोचली आहे, असा आरोपही शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये केलाय.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेय ?
मंत्री सेंथिल बालाजी यांच्या सचिवालयाच्या कार्यालयात झालेल्या ईडी कारवाईचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही निषेध व्यक्त केला. त्याशिवाय दाबावाची भाजपची ही रणनिती यशस्वी ठरणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे सूडाचं राजकारण जनता पाहत आहे, 2024 मध्ये जनाताच भाजपला उत्तर देईल.
काँग्रेस अध्यक्ष काय म्हणाले ?
तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचा काँग्रेसने जाहीर निषेध केला. मोदी सरकारचा हा धमकावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राजकीय विरोधकांविरोधात सरकारी यंत्रणाचा वापर करुन त्यांना दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलाय, हीच त्यांची ओळख झाली आहे. मोदी सरकारचे हे प्रयत्न विरोधकांना शांत करु शकत नाही, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
केजरीवाल यांचा भाजपला हल्लाबोल -
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विरोधकांना धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करतो. राजकीय सूडबुद्धीने भाजपने आंधळे होऊन बदला घेत आहे. त्यामुळे आपल्या लोकशाहीचे कधीही भरून न येणारे नुकसान होतेय.
ममता बॅनर्जी यांनाही साधला केंद्र सरकारवर निशाणा -
टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनीही सेंथिल बालाजी यांच्यावरील कारवाईनंतर निषेध व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. डीएमके यांच्याविरोधात भाजप सूडबुद्धीने कारवाई करत आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून हे घृणास्पद आहे.