नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानातून गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल
Narendra Modi Stadium Threatened to Bomb : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर आता गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताच्या 26 पर्यंटकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचा बदला आता भारताने घेतला असून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनला पाकिस्तानमधून धमकीचा एक मेल आला आहे.
पकिस्तानमधून आलेल्या या ईमेलमध्ये 'आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून देऊ' असे लिहिले आहे. या धमकीनंतर सुरक्षा एजन्सींनी तपास सुरू केला आहे आणि अहमदाबादमधील स्टेडियम आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम हे आयपीएल 2025 साठी महत्त्वाचे ठिकाण आहे. 14 मे आणि 18 मे रोजी येथे गुजरात टायटन्स आणि इतर संघांचे सामने होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कतेने काम सुरू ठेवले आहे.
India Operation Sindoor : भारताने बदला घेतला
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून पाकिस्तानात 100 किमी आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली.
या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी भारताने राफेल आणि सुखोई 30 एमकेआय या विमानांचा वापर केला. राफेल विमानांनी अत्याधुनिक स्काल्प मिसाईल्स डागली. अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प ही क्षेपणास्त्र वापरण्यात आली.
स्काल्प क्षेपणास्त्रांद्वारे 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा वेध घेतला जातो. एक हजार किमी प्रतीतास या वेगाने स्काल्प मिसाईल्स मारा करतात. विशेष म्हणजे शत्रूच्या रडारवर दिसत नसल्याने स्काल्प मिसाईल्स आली तरी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वितच झाली नाहीत. त्यामुळे पाकिस्तान ज्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या वल्गना करत होता त्या फोल ठरल्या.
ही बातमी वाचा:























