21 September In History : ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेतली, अमेरिकेत बिल क्लिंटन-मोनिकाचं सेक्स स्कॅन्डल उघडकीस; 21 सप्टेंबर या गोष्टींचा साक्षीदार
On This Day In History : बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हेन्स्की यांचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर बिल क्लिंटन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मुंबई: सप्टेंबर महिन्यातील आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. आजच्याच दिवशी सुमारे 180 वर्षांपू्र्वी फ्रान्समध्ये राजेशाही संपवण्यासाठी मतदान घेण्यात आलं होतं. 1857 उठावातील निर्णायक घटना म्हणजे दिल्लीवर ब्रिटिशांचा पुन्हा एकदा कब्जा. 1857 साली ब्रिटिशांनी दिल्ली पुन्हा एकदा ताब्यात घेत अखेरचा मुघल सम्राट बहादूरशाह जफर याला अटक केली होती. तसेच अमेरिकेत धुमाकूळ घातलेलं बिल क्लिंटन आणि मोनिका यांच्या प्रेमप्रकरणाा व्हिडीओ लिक झाला होता. जाणून घेऊया 21 सप्टेंबर हा दिवस इतिहासातील कोणत्या महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे.
1677- अग्निशनम यंत्राला पेटंट
भीषण आग विझवण्यासाठी उपयोगी येणाऱ्या अग्निशमन यंत्राला 21 सप्टेंबर 1677 साली पेटंट मिळालं. अग्निशमन यंत्राचे हे पेटंट नेदरलॅंडच्या जॉन आणि निकोलस वॉनडर हेडन यांच्या नावावर देण्यात आलं.
1784- अमेरिकेतल्या पहिल्या वृत्तपत्राचे प्रकाशन
21 सप्टेंबर 1784 साली अमेरिकेतील पहिले वृत्तपत्र 'पेनसिलव्हेनिया पॅकेट अॅन्ड जनरल अॅडव्हरटायझर' या नावाच्या पहिल्या वृत्तपत्राचं प्रकाशन करण्यात आलं.
1792- फ्रान्समध्ये राजेशाही समाप्त करण्यासाठी मतदान
फ्रान्समध्ये आजच्याच दिवशी, 21 सप्टेंबर 1792 साली नागरिकांनी राजेशाही समाप्त करण्यासाठी मतदान केलं. फ्रान्समध्ये राजेशाहीच्या आणि सरंजामी लोकांच्या आलिशान जीवनशैलीसाठी सामान्य लोकांना कर भरावा लागायचा. त्याप्रमाणात सुविधा मात्र त्यांना मिळायच्या नाहीत. फ्रान्समधील राजेशाहीविरोधात लोकांमध्ये संताप निर्माण झाला. त्याची परिणीती फ्रान्समध्ये राजकीय क्रांतीमध्ये झाली आणि राजेशाही समाप्त होऊन लोकशाहीचे सरकार सत्तेत आलं.
1832- साहित्यकार वॉल्टर स्कॉट यांचे निधन
प्रसिद्ध लेखक, नाटककार वॉल्टर स्कॉट यांचे 21 सप्टेंबर 1832 रोजी निधन झालं. स्कॉट हे इंग्रजी भाषेतील प्रथम साहित्यिक होते ज्यांना त्यांच्या जिवंतपणीच ख्याती प्राप्त झाली होती.
1857- ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली, बादशाह बहादूर शाह जफरला अटक
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये 1857 च्या उठावाचं (1857 Revolt) महत्त्व वेगळंच आहे. ब्रिटिशांची गुलामी मोडून काढण्याचा पहिला प्रयत्न या उठावाच्या माध्यमातून करण्यात आला. देशभरातील क्रांतिकारकांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफर याला दिल्लीचा बादशाह घोषित केलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी यांनी लढा दिला. उठावकर्त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि मुघल साम्राज्याची पुन्हा स्थापना झाल्याचं जाहीर केलं.
ब्रिटिशांनी आजच्याच दिवशी, 21 सप्टेंबर 1857 रोजी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली आणि उठाव मोडून काढला. 82 वर्षीय बादशाह बहादूरशाह जफर याला ब्रिटिशांनी अटक केली. नंतर त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि रंगून म्हणजे आजच्या म्यानमारमध्ये त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.
1926- अभिनेत्री नूर जहॉं यांचा जन्म
प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका नूर जहॉं यांचा आजच्याच दिवशी, 1926 साली जन्म झाला. संगितामध्ये मोठं योगदान त्यांनी दिलं. त्यांना ठुमरी गाण्यातील विशेष शैलीमुळे त्यांना ठुमरी गाण्याच्या महाराणी असं म्हटलं जायचं.
1964 - माल्टाला स्वातंत्र्य मिळालं
21 सप्टेंबर 1964 साली माल्टा या युरोपियन देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळालं.
1980- करिना कपूरचा जन्म
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना (Kareena Kapoor) कपूरचा 21 सप्टेंबर 1980 रोजी जन्म झाला. करिना कपूरचा जन्म कपूर घराण्यात झाला असून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी छाप उमटवली आहे.
1998- बिल क्लिंटन-मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रेमसंबंधाचा व्हिडीओ समोर
अमेरिकेच्या राजकीय इतिहासात खळबळ माजवणाऱ्या तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रेम प्रकरणाचा खुलासा (US President Bill Clinton Monica Lewinsky Sex Scandal) आजच्याच दिवशी झाला होता. 21 सप्टेंबर 1998 रोजी या दोघांच्या प्रेम प्रकरणाचा व्हिडीओ लोकांसमोर आला. त्यानंतर यावर बिल क्लिंटन यांनी ज्युरी समोर यासंबंधी आपला जबाब दिला. हा जबाब सर्व माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर बिल क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.