17 December In History : ब्रिटिश अधिकारी जेम्स साँडर्सची हत्या,अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन; आज इतिहासात
17 December In History : 17 डिसेंबर 1928 रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
मुंबई : 17 डिसेंबरचा दिवस इतिहासात दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनांसह नोंदवला गेला आहे. 17 डिसेंबर 1928 रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. याबरोबरच 2014 मध्ये 17 डिसेंबर रोजी अमेरिका आणि क्युबाने अनेक दशकांनंतर पुन्हा राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्याची घोषणा केली. फिडेल कॅस्ट्रो 3 जानेवारी 1961 रोजी बॅटिस्टा राजवट उलथवून सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले होते. परंतु 17 डिसेंबर 2014 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे नेते राऊल कॅस्ट्रो यांनी राजनैतिक संबंध पुन्हा जोडण्याची घोषणा केली. 17 डिसेंबर रोजी इतिहासात नोंदलेली दुसरी मोठी घटना 1903 मध्ये घडलीय. राईट बंधू ऑर्व्हिल आणि विल्बर यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये 'राइट फ्लायर' नावाच्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. त्यांचे विमान 120 फूट उंचीवर 12 सेकंदांपर्यंत उड्डाण करू शकले. यासह इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्यावर नजर टाकू.
1718 : फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रियाने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले
आजच्या दिवशी 17 डिसेंबर 1718 रोजी फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रियाने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
1903 : राईट बंधूंनी प्रथमच 'द फ्लायर' नावाच्या विमानाचे यशस्वीपणे उड्डाण केले.
राईट बंधू ऑर्व्हिल आणि विल्बर यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये 'राइट फ्लायर' नावाच्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. त्यांचे विमान 120 फूट उंचीवर 12 सेकंदांपर्यंत उड्डाण करू शकले. त्यानंतर 1905 मध्ये पहिले विमान तयार करण्यात आले. 17 डिसेंबर 1903 रोजी किलडेव्हिल हिल्सनजीक चार यशस्वी उड्डाणे केली. त्यांतील पहिल्या उड्डाणात ऑर्व्हिल हे चालक होते. त्यांनी 12 सेकंदात 36 मी. अंतर कापले. शेवटच्या सर्वांत जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते. त्यांनी 59 सेकंदांत 255 मी. अंतर कापले. ‘किटी हॉक’ याच लोकप्रिय नावाने ओळखण्यात येणारे हे विमान पुढे 17 डिसेंबर 1948 रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले.
1925 : सोव्हिएत युनियन आणि तुर्कीने एकमेकांवर हल्ला न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली
सोव्हिएत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हिएत संघाची स्थापना 30 डिसेंबर 1922 रोजी झाली आणि 26 डिसेंबर 1991 रोजी त्याचे 15 देशांमध्ये विघटन झाले. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा एक तृतीअंश भाग आणि युरोप खंडाचा एक दृतीअंश भाग व्यापला होता. 17 डिसेंबर 1925 रोजी सोव्हिएत युनियन आणि तुर्कीने एकमेकांवर हल्ला न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली
1928 : क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
17 डिसेंबर 1928 रोजी क्रांतिसिंह भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. जेम्स स्कॉट याला ठार मारण्याचे नियोजन होते. परंतु, चुकून साँडर्स बळी पडला. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले.
1970 : अमेरिकेने नेवाडा चाचणी साइटवर आण्विक चाचणी केली
अमेरिकेने 17 डिसेंबर 1970 रोजी नेवाडा चाचणी साइटवर आण्विक चाचणी केली.
1972 : अभिनेता जॉन अब्राहमचा वाढदिवस
अभिनेता जॉन अब्राहम याचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी झाला. अनेक जाहिराती आणि कंपन्यांसाठी मॉडेलिंग केल्यानंतर त्याने जिस्म (2003) चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाने त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार नामांकन मिळवून दिले. त्यानंतर त्याचे पहिले व्यावसायिक यश धुमाळ (2004) होते. धूम आणि जिंदा (2006) मधील नकारात्मक भूमिकांसाठी त्याला दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकन मिळाले.
1978 : अभिनेता रितेश देशमुख याचा वाढदिवस
अभिनेता रितेश देशमुखचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. राजकीय कुटुंबातील असूनही रितेशने राजकारणाऐवजी अभिनयाची निवड केली आणि 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूजा होती. या चित्रपटातील दोघांचा अभिनय आणि धमाकेदार केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर रितेशने एकामागून एक अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये मस्ती, क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल वीकली, अपना सपना मनी मनी, हे बेबी, धमाल, हमशकल्स इत्यादींचा समावेश आहे. अभिनयासोबतच रितेशने काही मराठी चित्रपटांची निर्मितीही केली असून काही पुरस्कार सोहळ्यांचे आयोजनही केले आहे.
रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी अभिनेत्री जेनेलिया डिसूझासोबत लग्न केले. रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवूडमधील सर्वात गोंडस जोडपे आहेत. रितेश आणि जेनेलिया यांना रायन आणि राहुल ही दोन मुले आहेत. रितेश सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोअर्स लाखोंच्या घरात आहेत.
2011 : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग इल यांचे निधन
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग इल यांचे 17 डिसेंबर 2011 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 2011 मध्ये किम जोंग-उन यांनी उत्तर कोरियाची धुरा सांभाळली.
2014 : अमेरिका आणि क्युबाने अनेक दशकांपासून तुटलेले राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली
2014 मध्ये 17 डिसेंबर रोजी अमेरिका आणि क्युबाने अनेक दशकांनंतर पुन्हा राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्याची घोषणा केली. फिडेल कॅस्ट्रो 3 जानेवारी 1961 रोजी बॅटिस्टा राजवट उलथवून सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले होते. परंतु 17 डिसेंबर 2014 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे नेते राऊल कॅस्ट्रो यांनी राजनैतिक संबंध पुन्हा जोडण्याची घोषणा केली.
2016 : आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
2019 : मराठी अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन
आपल्या समर्थ अभिनयाने डॉ. श्रीराम लागूंनी रंगभूमी, सिनेमा ही माध्यमे गाजवली. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला. शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम केले. नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. 17 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.