गोव्यात 24 असुरक्षित ठिकाणांवर ‘नोन-सेल्फी’ झोनचे साइनबोर्ड
सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणचे प्रकार थांबवण्यासाठी सरकार नियुक्त जीवरक्षक एजन्सी ‘दृष्टी मरीन’ने ओळखल्या गेलेल्या 24 असुरक्षित सेल्फी ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’ झोनचे साइनबोर्ड लावण्याचे ठरविले आहे.
पणजी: किनारपट्टीवरील दगडांवर राहून सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी सरकार नियुक्त जीवरक्षक एजन्सी ‘दृष्टी मरीन’ने ओळखल्या गेलेल्या 24 असुरक्षित सेल्फी ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’ झोनचे साइनबोर्ड लावण्याचे ठरविले आहे.
यामध्ये उत्तर गोव्यातील बागा नदी, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ला, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी व बांबोळी आणि शिरडाव तर दक्षिणमधील आंगोद, बोगमालो, होलांत, बायणा, जपानिझ बाग, बेतुळ, कणांगाइणी, पालोले, खोला, काबो द रामा, पोळे, गालजिबाग, ताळपोणा व राजबाग या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’ संकेत सूचक लावण्याचा विचार ‘दृष्टी मरीन’ने केला आहे.
दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले, “काही ठिकाणांवर असलेले साइनबोर्ड अपग्रेड करण्यात आले आहेत. झेंड्यांवर सचित्र निर्देश (पिक्टोरियल इनस्ट्रक्शन), आपातकालीन टोल फ्री क्रमांक व काय करावे आणि काय करू नये या बद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
दृष्टी मरीनने 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना व प्रवाशांना समुद्रात न जाण्याचे जारी केलेल्या मार्गदर्शक इशारावजा सूचनाद्वारे कळवण्यात आले आहे. कारण या दिवसात समुद्र व वाऱ्याचे वातावरण पोहण्यासाठी व पाण्यातल्या मनोरंजक उपक्रमांसाठी उपयुक्त नसते. सर्व ‘नॉन-स्विम’ ठिकाणांवर लाल झेंडे रोवण्यात आले आहेत.
दृष्टीचे जीवरक्षक मान्सूनमध्ये वातावरणावर बारकाईने लक्ष ठेवून बसले आहेत. यासाठी ते दररोज सकाळी 7:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम करतात. याव्यतिरिक्त आपतकालीन सेवेसाठी 2 जीवरक्षक रात्री 8 वाजेपर्यंत जीवरक्षक टॉवरवर तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत समुद्र सुरक्षा गस्तांद्वारे (बी.एस.पी.) समुद्रावर परिक्षण केले जाते.
दृष्टी मरीनबद्दल थोडक्यात ‘दृष्टी मरीन’ पर्यटन खात्याच्या वतीने कचरा व्यवस्थापन, समुद्र व मरीन सुरक्षा व बचाव सेवा या कामांमध्ये सक्रीय आहे. दृष्टी मरीनकडे सध्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर व पाणीसाठा ठिकाणे जसे दूधसागर व मये येथे 600 हून अधिक जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. दृष्टीचे सर्व जीवरक्षकांना प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रशिक्षण एजन्सी विशेष बचाव प्रशिक्षण अकादमीतर्फे (स्पेशल रेस्क्यू ट्रेनिंग अकादमी) प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
याव्यतिरिक्त कंपनीतर्फे समुद्रावर समुद्र सुरक्षा गस्ताच्या समुद्र मार्शल्सद्वारे संध्याकाळ ते मध्यरात्रीपर्यंत गस्त ठेवण्यात येते. 2008 सालापासून दृष्टीने हस्तक्षेप बचावातर्फे 3000 हून अधिक जणांचे प्राण वाचवले आहेत. ज्यामुळे गोव्यातील समुद्रावरील मृत्यूंच्या संख्येत 99 टक्क्यांनी घट झाली आहे.
दृष्टी मरीन हा दृष्टी समूहाचा भाग असून त्यांचा व्यावसायिक आणि अनुभवाचा मोठा इतिहास आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने समुद्री पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि निरंतरता यामध्ये वैविध्यपूर्ण रुची निर्माण केली आहे.