Vidarbha state : वेगळ्या विदर्भ राज्याचा विचार? केंद्र सरकारने संसदेला दिली 'ही' माहिती
Central Government on Vidarbha state : महाराष्ट्रपासून वेगळा विदर्भ राज्य निर्मिती करण्यासाठी अनेकवेळेस आंदोलने झाली आहेत. केंद्र सरकारने विदर्भ राज्याबाबत मोठी माहिती दिली आहे.
Vidarbha State : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मागील काही दशकांपासून सुरू आहे. महाराष्ट्रापासून स्वतंत्र होत वेगळ्या विदर्भाच्या राज्यासाठी मागणीसाठी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. आता केंद्र सरकारने विदर्भ राज्याबाबत संसदेला महत्त्वाची माहिती दिली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली.महाराष्ट्र सोडून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने काही पाऊल उचलले आहे किंवा करण्याचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्राने म्हटले. नवीन राज्यांच्या निर्मितीसाठी विविध व्यक्ती आणि संघटनांकडून वेळोवेळी मागणी करण्यात येते, त्यासाठी निवेदन देण्यात येतात.
"नवीन राज्याच्या निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या संघीय राजकारणावर होतो. नवीन राज्यांच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेत असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले.
महाराष्ट्र राज्यात विदर्भाचा विकास खुंटला असल्याची भावना विदर्भवाद्यांकडून व्यक्त केली जाते. मागील काही दशकांपासून स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलने सुरू असतात. या मुद्यावर अनेकदा राजकारणही झालेले आहे. विदर्भाने संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होताना नागपूर करार केला होता. वर्षातून एकवेळ सरकार ठराविक कालावधीसाठी नागपुरात येईल, या अटीचा यात समावेश होता.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या उत्तरावर विदर्भवादी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती, ठरावही केला होता. मात्र, अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचा सूर विदर्भावाद्यांनी लावला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Ravikant Tupkar : आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक
नाशिकमध्ये 10 डिसेंबर, मुंबई-पुण्यात 15 डिसेंबर, तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी उघडणार?