एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण जाधवविरोधात निर्णायक पुरावे नाहीत, पाकची कबुली
इस्लामाबाद : हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव विरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. जाधवविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं.
मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधवला रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं.
'उपलब्ध कागदपत्रं पुरेशी नाहीत. आता संबंधित अधिकारी जाधवबद्दल अधिक माहिती पुरवायला किती काळ लावतील, हे त्यांच्यावर अवलंबून आहे' असंही अजीझ यांनी स्पष्ट केलं. कोणत्या विभागाने कुलभूषण जाधवबाबत माहिती गोळा केली, याची माहिती मात्र अजीझ यांनी दिलेली नाही. मार्च महिन्यात लष्कराकडून कुलभूषण जाधवच्या अटकेची घोषणा करण्यात आली होती.
2013 पासून कराची आणि बलुचिस्तानातील विघातक कारवायांमध्ये कुलभूषण जाधवचा हात असल्याचा दावा लष्कराने केला होता. इतकंच नाही, तर जाधवने तशी कबुली दिल्याचा दावाही लष्कराने केला होता.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
माजी नौदल अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधववरील सर्व आरोप भारत सरकारने फेटाळून लावले होते. जाधव हे आपल्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण जाधव मूळचे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव परिवाराने फेटाळून लावला.' माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.' अशी माहिती त्यांनी मार्च महिन्यात दिली होती.
जाधव यांच्यावरील आरोप काय?
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांना दिलेल्या डोसियरमध्ये जाधव यांचा पासपोर्ट दिला होता. त्यावर त्यांचं नाव हस्नेन मुबारक पटेल असं लिहिलं असून इराणमार्गे ते पाकिस्तानात घुसल्याचा दावा करण्यात आला होता.
कबुलीचा कथित व्हिडिओ
पाककडून कुलभूषण जाधव यांच्या कबुलीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. आपण रॉसाठी काम करत असल्याचा दावा त्यांनी व्हिडिओत केला असून भारत सरकारने मात्र या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. 358 सेकंद म्हणजे सुमारे 6 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तब्बल 102 कट्स असल्याचं समोर आलं.
पाकिस्तान सरकार आणि लष्करानं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव स्वतः रॉचे एजंट असल्याची कबुली देताना दिसत आहेत.
'मी भारतीय नौदलाचा अधिकारी असून 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार. 2002 मध्ये 14 वर्षांच्या सेवेनंतर मी गुप्त अभियान सुरु केलं. 2003 मध्ये मी इराणच्या चबाहारमध्ये एक छोटा उद्योगधंदा सुरु केला. माझ्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. 2003-04 मध्ये मी कराची दौरा केला. रॉसाठी भारतात काही काळ काम केल्यानंतर 2013 मध्ये मी रॉमध्ये सहभागी झालो.' अशी कबुली कुलभूषण जाधव देताना दिसतात.
भारत सरकारने मात्र त्या व्हिडिओची सत्यता आणि त्यात करण्यात आलेले आरोप सपशेल नाकारले. कुलभूषण हे 'रॉ'चे एजंट नसल्याचं भारतानं ठणकावून सांगत हा सगळा प्रकार त्यांच्याकडून वदवून घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे.
पाकिस्तानने जारी केलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याच्या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे पापणी न हलवता बोलत आहेत, यावरुन ते टेलिप्रॉम्प्टर वाचत असल्याचं स्पष्ट होत आहे. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचं संकलन केल्याचंही स्पष्ट दिसत आहे.
सत्यता पडताळण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांना कुलभूषण यांची भेट घेऊ देण्याची मागणी भारत सरकारतर्फे करण्यात आली होती, मात्र पाकिस्तानने ती फेटाळून लावली.
पनवेल कनेक्शन :
कुलभूषण जाधव यांच्या पासपोर्टचं कनेक्शन पनवेलमधून समोर आलं होतं. कुलभूषण यांच्या पासपोर्टवर हुसैन पटेल असं नाव असून त्या पासपोर्टवरचा पत्ता हा पनवेलमधल्या हाय पॉईंट सोसायटीतल्या फ्लॅटचा आहे. ज्याची मालकी अवंती जाधव यांच्या नावावर आहे. पण अवंती जाधव कोण आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
पाच वर्षांपूर्वी याच फ्लॅटमध्ये हुसैन पटेल नावाच्या एका माणसानं हा फ्लॅट आपण खरेदी केल्याचं सांगून राहण्यास सुरुवात केली. पण सोसायटीने जेव्हा खरेदीपत्राचा पुरावा मागितला तेव्हा हुसैन पटेल तो देऊ शकला नाही. मार्च महिन्यात पाच महिन्यांपासून हुसैन पटेल या फ्लॅटकडे फिरकलेलाच नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रकरणातलं गूढ वाढलं आहे.
संबंधित बातम्या :
हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक
हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स
कथित कबुलीनाम्याचा व्हिडिओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement