New Parliament : होम-हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि मोदींचे भाषण... असं आहे नवीन संसदेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे टाईमटेबल
New Parliament Building: लोकसभेत सकाळी 8.30 ते 9 वाजण्याच्या दरम्यान सेंगोल म्हणजे राजदंडांची प्रतिष्ठापणा करण्यात येईल. या कार्यक्रमात तामिळनाडूतील 20 साधू-संत सहभागी होतील.
नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचं 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी या तयारीला अंतिम रुप देण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी सूत्रांच्या हवाल्याने उद्घाटन दिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 मे रोजी सकाळी 7.30 ते 8:30 पर्यंत हवन आणि पूजा होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम जाणून घ्या
- लोकसभेत सकाळी 8.30 ते 09 या वेळेत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजे राजदंड लावला जाईल. तामिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत या वैदिक विधीमध्ये सहभागी होतील.
- सकाळी 09 ते 9:30 या वेळेत सर्वधर्मीय प्रार्थना सभा होईल. यामध्ये शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी संबोधिन करणार
दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दुपारी 12 वाजता राष्ट्रगीताने होईल. यासोबतच दोन लघुपटांचे प्रदर्शनही होणार आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन करतील. लोकसभा अध्यक्षही यावेळी संबोधन करणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी नाणे आणि टपाल तिकीट काढण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. दुपारी अडीच वाजता या कार्यक्रमाची सांगता होईल.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर देशातील प्रमुख 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मात्र विरोधकांच्या बहिष्कार कार्यक्रमाला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. आंध्र प्रदेशचे सत्ताधारी वायएसआरसीपीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे, तर बहुजन समाज पक्ष (बीएसपी) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले की नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे चुकीचं आहे.
कशी असणार आहे संसदेची नवी इमारत?
- संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.
- लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था.
- सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक.
- या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल.
- याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.
ही बातमी वाचा: