New Parliament Building: नव्या संसद भवनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यास विरोध; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
New Parliament Building: नव्या संसद भवनाचं 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंरतु, याविरोधातील याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
New Parliament Building: नवी दिल्ली (New Delhi) येथे उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं (New Parliament Building) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे करणार आहेत. भविष्यात होणाऱ्या राजकीय विस्ताराचा विचार करुन या नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. पण या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सध्या चांगलाच रंगला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. परंतु या निर्णयाला सर्व स्तरावरुन चांगलाच विरोध होत आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, यासाठी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक असून संविधानाच्या अनुच्छेद 79 नुसार संसद भवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं देखील या याचिकेमध्ये म्हटलं आहे.
आर. जयासुकिन यांनी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या या याचिकेमध्ये म्हटलं आहे की, "देशाच्या संविधानाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करतात. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात."
याचिकेमध्ये काय म्हटलं आहे?
या याचिकेमध्ये म्हटले आहे की, अनुच्छेद 85 नुसार राष्ट्रपती या संसदेचं सत्र बोलवतात. तसेच अनुच्छेद 87 नुसार त्याचं संसदेत अभिभाषण देखील होतं, ज्यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सदनांना संबोधित करतात. तसेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं.
तसेच याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे की, "18 मे रोजी लोकसभा सचिवांनी संसद भवनाच्या उद्घाटनची जी निमंत्रण पत्रिका जाहीर केली आहे, ती असंवैधानिक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने हे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे असे निर्देश द्यावेत."
राजकीय वर्तुळात पडसाद
तसेच विरोधी पक्षाकडून देखील या निर्णयाला सतत विरोध होत असल्याचं चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहयला मिळतयं. तर भाजपकडून मात्र या निर्णयाचं चांगलचं समर्थन करण्यात येत आहे. काँग्रेचे नेते राहुल गांधी यांनी 'राष्ट्रपतींकडून उद्घाटन करण्यात यावे', अशी मागणी करण्यात आली होती. 'मात्र पंतप्रधान मोदी यांनी या संसद भवनासाठी मेहनत घेतली असून तेच याचं उद्घाटन करतील', असं भाजपकडून सांगण्यात येत आहे.
उद्घाटन सोहळ्यात सर्व पक्षांचा सहभाग
या उद्घाटन सोहळ्याला देशभरातील सर्व राजकिय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राजकिय पक्षांचे प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
तीच पुनरावृत्ती! हैदराबादमध्ये श्रद्धासारखं हत्याकांड; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेमिकेची हत्या