एक्स्प्लोर
नेस्लेची मॅगी पुन्हा वादात, कंपनीसह वितरक आणि विक्रेत्यांना 62 लाखांचा दंड
केवळ दोनच मिनिटात फटाफट तयार होणारी मॅगी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी न्यायालयाने नेस्ले आणि त्यांच्या वितरकांना तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला आहे.

फाईल फोटो
नवी दिल्ली : केवळ दोनच मिनिटात फटाफट तयार होणारी मॅगी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी न्यायालयाने नेस्ले आणि त्यांच्या वितरकांना तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला आहे. मॅगी नूडल्सच्या सॅम्पलमध्ये अॅश कंन्टेट (राख) जास्त आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 2015 मध्ये नेस्ले नूडल्सचे सात सॅम्पल्स लखनऊच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 2016 मध्ये याचा अहवाल आल्यानंतर, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात नेस्ले विरोधात दंडात्मक कारवाई केली. न्यायालयाने ठोठावलेल्या दंडामध्ये कंपनीला 45 लाख, तर वितरकांना 15 लाख, शिवाय विक्रेत्यांनाही दोन लाख भरावे लागणार आहेत. दरम्यान, नेस्लेच्या मॅगी नूडल्समध्ये शिसांचे प्रमाण जास्त आढळल्याने 2015 मध्ये मॅगीची उत्पादनं वादात सापडली होती. यावेळी पाच महिने कंपनीच्या उत्पादनांवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात आली होती. दुसरीकडे नेस्लेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "न्यायालयाच्या निर्णयाची प्रत अद्याप मिळाली नाही. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मॅगीचे प्रयोगशाळेत पाठवलेले सॅम्पल 2015 मधील होते. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर याविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहोत."
आणखी वाचा























