ईव्हीएमविरोधात राष्ट्रवादीची निदर्शनं
राष्ट्रवादीच्या खासदारांनी 'ईव्हीएम हवाट, देश बचाव' अशी घोषणाबाजी यावेळी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान उपस्थित होते.
नवी दिल्ली : देशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शनं केली. राष्ट्रवादीच्या खासदारांनी 'ईव्हीएम हवाट, देश बचाव' अशी घोषणाबाजी यावेळी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान उपस्थित होते.
"ईव्हीएम विरोधात असणारे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी काल निवडणूक आयोगाला भेट दिली. जवळपास 17 राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा या सर्व राजकीय पक्षांना संशय आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या", अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
"ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ते आम्हाला न्याय देतील", असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
ईव्हीएमविरोधात राज ठाकरेही आक्रमक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. ईव्हीएमवर बंदी घालण्याचं आवाहन राज ठाकरेंनी या पत्रातून केलं आहे. राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले आहेत. ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं. भाजप वगळता सर्व पक्षाच्या प्रमुखांना राज ठाकरेंनी पत्र दिलं.