Coronavirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक
ब्रिटन शासनाकडून कोरोना व्हायरसचा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे.
(Coronavirus) कोरोना व्हायरसच्या लसीकरणाऱ्या हालचालींना वेग आलेला असतानाच भारतात आता आरोग्य मंत्रालयापुढं आणखी एक आव्हान उभं राहू लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुळात हे आव्हान उभं राहण्यापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठकही बोलवल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये निरीक्षणादरम्यान कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार उघड झाल्यामुळं सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्याच्या घडीला ब्रिटनमध्ये कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर असण्यास कोरोनाचा हा नवा प्रकारच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीची टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'ब्रिटनमधील कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकाराची माहिती मिळताच यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवेतील डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडेल. भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिन हेसुद्धा या बैठकीत सहभागी होण्याचा अंदाज आहे'.
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटींच्याही पलीकडे....
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या नव्या माहिती आणि आकडेवारीनुसार भारतात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटींच्याही पलीकडे गेला आहे. सध्याच्या घडीला हा आकडा 1 कोटी 31 हजारांवर गेला असून हा आकडा वाढतच आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग काहीसा कमी असला तरीही रुग्ण वाढत आहेत ही बाब टाळता येत नाही. आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गामुळं देशात तब्बल 1 लाख 45 हजार 477 कोरोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देशात तुलनेनं जास्त आहे. ही दिलासादायक बाब.
मागील 7 दिवसांपासून सातत्यानं देशात कोरोना रुग्णांचा आकडा 30 हजारहून कमी असल्याचं पाहायला मिळालं. शिवाय आता लसीकरणाच्या बाबतही हालचाली वेगानं सुरु झाल्यामुळं किमान ही परिस्थिती नियंत्रणातच ठेवत कोणत्याही नव्या संकटापासून देशाला दूर ठेवण्याकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा भर असेल.