National Teachers Award : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान, 'या' शिक्षकांची उल्लेखनीय कामगिरी जाणून घ्या...
National Teachers Award 2022 : यंदा महाराष्ट्रातील कविता संघवी, शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
National Teachers Award 2022 : आज शिक्षक दिनाच्या (Teachers Day) निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers Award) देऊन सन्मान करण्यात आला. एकूण 46 शिक्षक यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 चे मानकरी ठरले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील कविता संघवी, शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. यामध्ये दोघे शिक्षक बीड जिल्ह्यातील आणि एक मुंबईतील आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे, बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके आणि मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्रीतील तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक
- शशिकांत संभाजीराव कुलथे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बीड
- सोमनाथ वामन वाळके, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, पारगाव जोगेश्वरी, बीड
- कविता संघवी, प्राचार्य, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, मुंबई
शशिकांत कुलथे : क्यूआरकोड आधारित पीडीएफमुळे सवडीनुसार अभ्यास करणं सोपं
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक शशिकांत संभाजीराव कुलथे (Shashikant Kulthe) यांनी कायापालट केला आहे. या शाळेत मुलांना शिकवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. कुलथे यांनी क्यूआरकोड आधारित स्मार्ट पीडीएफ तयार केले. यामुळे विद्यार्थ्यांना सोयीच्या वेळेनुसार, कुठेही आणि कधीही अभ्यास करता येतो. येथे मुलांना शिकवण्यासाठी स्लाइड प्रोजेक्टरचाही वापर केला जातो. तंत्रज्ञानापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक प्रकारात मुलांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिलं जातं. कुलथे यांनी एमए, एमईड, हिंदी, उर्दू भाषांसह संगीतातही प्रभुत्व मिळवलं आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की, 'पारंपारिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने मुलांना शिक्षण द्यायचे, त्यामुळे त्यांची आवड वाढते आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावरही भर देता येतो.' शाळेने मुलांसाठी ब्लॉग तयार केला. त्याद्वारे मुलांची कला सर्वांपर्यंत वापर. शाळेद्वारे अभ्यासक्रमावर आधारित अॅनिमेटेड व्हिडीओ YouTube वर अपलोड केले जातात. याशिवाय ही शाळा जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
सोमनाथ वाळके : आधुनिक तंत्रज्ञांनाचा शिक्षणासाठी वापर
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे असलेल्या पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सोमनाथ वामन वाळके (Somnath Walke) यांनी आधुनिक तंत्रज्ञांनाचा शिक्षणासाठी वापर केला. त्यांनी शाळेचा प्रत्येक भागात बदल करत तेथून मुलांना काही ना काही शिकता यावा असा बनवला आहे. ही सरकारी शाळा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व साधनांचा वापर करून आधुनिकीकरण करण्यात आली आहे. शाळेत टॅबलेट कॉम्प्युटर, स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर सारखी साधने उपलब्ध आहे. शाळेत मुलांना रोबोट बनवायला आणि कोडींग करायलाही शिकवलं जातं. वाळके यांनी मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी अनेक युक्त्या केल्या आहेत. शाळेने एक रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला आहे, इथे मुले कविता किंवा गाणी रेकॉर्ड करू शकतात. शाळेमध्ये एक वाद्य वर्गही आहे, यामध्ये 15 विविध प्रकारची वाद्ये शिकवली जातात. येथे मुलाना त्यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त खूप काही शिकायला मिळतं.
कविता संघवी : विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहन
मुंबईतील विलेपार्ले येथील छत्रभुज नरसी मेमोरियल (CNM) या खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता संघवी (Kavita Sanghvi) यांचाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. कविता संघवी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिलं आहे. CNM शाळेला नावीन्यपूर्णतेच्या बाबतीत जगातील 10 सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळालं आहे. यामध्ये कविता संघवी यांचं योगदान आहे. 20 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संघवी यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत.