National Doctors Day 2020 | डॉक्टर दिवस का साजरा केला जातो? या दिवसाची सुरुवात कशी झाली?
भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीत ते फ्रण्ट लाईन योद्धा म्हणून लढत आहेत. रुग्णसेवेप्रती समर्पित असलेल्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.
![National Doctors Day 2020 | डॉक्टर दिवस का साजरा केला जातो? या दिवसाची सुरुवात कशी झाली? National Doctors Day 2020 - Know why doctors day is celebrated on 1st July latest updates National Doctors Day 2020 | डॉक्टर दिवस का साजरा केला जातो? या दिवसाची सुरुवात कशी झाली?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/01152918/Doctors-Day.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. त्यांना जीवनदाताही म्हटलं जातं. कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीत तर याची प्रचिती आली आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी फ्रण्ट लाईन योद्धा म्हणून लढत आहेत. प्रत्येक परिस्थितीत आपलं कर्तव्य निभावत रुग्णांना चांगले उपचार कसे मिळतील यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात. रुग्णसेवा आणि कामाप्रती समर्पित असलेल्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला आहे. भारताचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिवस देशभरात साजरा होतो.
भारतात दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिवसाची थीम असते. मागील वर्षी डॉक्टर दिवसाची थीम होती 'झीरो टॉलरन्स टू व्हॉयलेन्स अगेन्स्ट डॉक्टर्स अॅण्ड क्लिनिकल स्टॅबलिशमेंट'. यंदाची थीम 'COVID-19 ची मृत्यूदर कमी करणं' अशी आहे.
कशी झाली राष्ट्रीय डॉक्टर दिवसाची सुरुवात? 1 जुलै रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि स्मृतीदिन असतो. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्त्वामुळे त्यांना बंगालचे शिल्पकारही म्हटलं जातं. 1961 मध्ये त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने अर्थात भारतरत्नने गौरवण्यात आलं. त्यांच्या सन्मानार्थ तत्कालीन केंद्र सरकारने 1991 मध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो..
कोण होते डॉ. बिधानचंद्र रॉय? डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांनी कोलकातामध्ये आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर लंडनमधून एमआरसीपी आणि एफआरसीएसची पदवी मिळवली. भारतीय असल्याने त्यांना आधी लंडनच्या सेंट बार्थोलोम्यू रुग्णालयात प्रवेश दिला नव्हता. दीड महिना रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे अर्ज करत राहिले, अखेरीस अधिष्ठातांनी 30वा अर्ज स्वीकारला, असं म्हटलं जातं. रॉय यांनी सव्वा दोन वर्षातच फिजिशन आणि सर्जन अशा दोन्ही पदव्या एकाचवेळी मिळवल्या.
लंडनमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परते आणि 1911 मध्ये प्रॅक्टिसला सुरुवात केली. भारताच्या संशोधन क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं आणि सन्मान मिळवला. याशिवाय ते राजकारणातही सक्रिय होते. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदीही विराजमान झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच्या जन्मदिवसालाच म्हणजेच 1 जुलै रोजी त्यांचं निधन झालं.
मुंबई पोलिसांचा सुपरहिरो डॉक्टरांना सलाम मुंबई पोलिसांनी आपल्या अनोख्या स्टाईल आणि अंदाजात डॉक्टरांना सलाम केला आहे. "डॉक्टरांचे अॅप्रॉन कोणत्याही सुपरहिरोच्या केपपेक्षा कमी नाही. या शहराच्या निस्वार्थ सेवेसाठी आम्ही डॉक्टारांचे आभार मानतो," असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.डॉक्टर सुपरहिरो नाही, पण सुपरहिरोपेक्षा कमी नाही! आमच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.#NationalDoctorsDay
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)