(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध; गुवाहाटी उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
गुवाहाटी उच्च न्यायालयाने मुस्लिम युवकाने हिंदू महिलेसोबत केलेल्या दुसऱ्या विवाहाच्या खटल्यावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार हा विवाह अवैध असल्याचं न्यायालयाचं मत आहे.
गुवाहाटी : एखाद्या मुस्लिम व्यक्तीने हिंदू स्त्री सोबत दुसरा विवाह केल्यास तो कायदेशीररित्या अवैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला आहे. द स्पेशल मॅरेज अॅक्ट, 1954 नुसार अशा प्रकारच्या विवाहाला कायदा मान्यता देत नसल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. (Muslim man's second marriage with Hindu woman void says Gauhati HC).
काय होतं प्रकरण?
आसाममधील सहाबुद्दीन अहमद हे कामरुप जिल्ह्यातील अहमदनगर कार्यालयात नोकरीला होते. 2017 साली एका अपघातात सहाबुद्दीन यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी दीपमणी करिता यांनी आपल्याला पेंशन आणि इतर सरकारी लाभ मिळावेत अशा आशयाची एक याचिका दाखल केली होती. कलिका यांना 12 वर्षाचा एक मुलगा आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना गुवाहाटी उच्च न्यायालयाने सांगितलं की, "याचिकाकर्त्या कलिता आणि मृत सहाबुद्दीन अहमद यांच्यामध्ये झालेल्या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार करण्यात आली होती यात काही शंका नाही. त्यावेळी त्यांचे पती जिवंत होते. पण सहाबुद्दीन अहमद यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट होऊन, त्या तारखेनंतर दुसरा विवाह झाल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांकडे नाही."
गुवाहाटी उच्च न्यायालयाने हा निकाल देताना मोहम्मद सलीम अली (मृत) विरुद्ध शमसुद्दीन (मृत) या खटल्याचा संदर्भ दिला. मुस्लिम कायद्याप्रमाणे, मूर्ती पूजा करणाऱ्या व्यक्तीसोबत जर मुस्लिम व्यक्तीचा विवाह झाला तर तो विवाह अमान्य असल्याचं या खटल्यात सांगण्यात आलं होतं.त्याचाच संदर्भ या खटल्यात देण्यात आला. तसेच इस्लाम धर्माच्या नियमानुसार, लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी इस्लामला मानायला हवं असंही सांगितलं आहे.
या सगळ्याचा संदर्भ देत गुवाहाटी उच्च न्यायालयाने एखाद्या मुस्लिम व्यक्तीने हिंदू स्त्री सोबत दुसरा विवाह केल्यास तो कायदेशीररित्या अवैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला.
संबंधित बातम्या :