नागपुरात चिमूटभर तंबाखूसाठी एका प्रवासी मजुराची हत्या
नागपूर भंडारा रोडवर कापशी पुलाजवळ 28 मे रोजी एका तरुणाचे रक्ताच्या थारोळ्यात असलेले मृतदेह आढळले होते. पोलिसांना सूचना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा डोक्यावर मोठ्या दगडाने प्रहार करून त्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
नागपूर : गुन्हेपूर अशी प्रतिमा असलेल्या नागपुरात कोणत्या कारणासाठी एखाद्याची हत्या होईल याचा काहीही नेम नाही. कारण नागपुरात अवघ्या चिमूट भर तंबाखु आणि अर्धा बाटली दारूच्या वादातून एका एका प्रवासी मजुराची हत्या झाल्याचे समोर आले आहे. 28 मे रोजी नागपूरच्या कापसी पुलाजवळ सुमारे 25 वर्ष असलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच प्रकरणाच्या तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोघांनी खुनाची कबुली दिली आहे. मात्र, मृत तरुण कोण आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
नागपूर भंडारा रोडवर कापशी पुलाजवळ 28 मे रोजी एका तरुणाचे रक्ताच्या थारोळ्यात असलेले मृतदेह आढळले होते. पोलिसांना सूचना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा डोक्यावर मोठ्या दगडाने प्रहार करून त्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, हत्या झालेला तरुण कोण, त्याला मारणारे कोण याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. सध्या दक्षिण भारतातून येऊन मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या दिशेने जाणारे हजारो मजूर कापशी पुलाजवळून जात असल्याने मृत तरुण त्यापैकीच एक प्रवासी मजूर असावा अशी शक्यता बळावली. पोलिसांनी परिसरात विचारणा केली असता 27 मे च्या रात्री एक अनोळखी इसम पुलाजवळ बसला होता अशी माहिती मिळाली.
पुढील काही दिवस पोलिसांनी त्या परिसरात आपले खबरे पेरले. खबऱ्यांकडून पोलिसांना या हत्या प्रकरणाबद्दल एक महत्वाचा धागा मिळाला आणि तो म्हणजे अमित उर्फ जल्या काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्मा हे दोघे इसम 27 मे च्या रात्री अंधारात कापसी पुलाजवळ घुटमळत होते. दोघांचा परिसरात शोध घेतल्यावर ते कुठेही मिळून आले नाही. काल अमित काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्मा हे दोघे मेडिकल चौक परिसरात दिसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली. मात्र, दोघांनी हत्येमागे जे कारण सांगितले ते अत्यंत धक्कादायक होते. आरोपींनी दिलेल्या माहिती प्रमाणे मृत तरुण हा कापसी पुलाजवळून जाणारा एक प्रवास मजूर होता. दमल्यामुळे रात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी थांबून तो मद्यपान करत होता. दोघे त्याच्या जवळून गेल्यावर त्या तरूणाने दोघांकडे चिमूट भर तंबाखू मागितले. अमित आणि पुरुषोत्तम ने तंबाखू देण्यास होकार दिले. मात्र, मोबदल्यात त्या तरुणाजवळची अर्धी बॉटल दारू मागितली.
तंबाखू घेतल्यानंतर त्या तरुणाने अर्धी बॉटल दारू दिली. मात्र, काही क्षणातच ती परत हिसकावून घेतली, त्यामुळे तिघांमध्ये वाद झाला. थोड्या वेळानंतर अमित आणि पुरुषोत्तम तिथून निघून गेले आणि काही वेळाने दारू खरेदी करून पुन्हा त्या ठिकाणी आले. दोघांनी मनसोक्त दारू पिल्यानंतर पुन्हा त्या तरुण मजुराला शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे तिघांमध्ये पुन्हा वाद वाढत जाऊन हातघाई वर आला. तेवढ्यातच अमित आणि पुरुषोत्तम ने त्या ठिकाणी पडलेला मोठा दगड उचलून त्या मजुराच्या डोक्यावर मारला. त्यामध्ये जखमी झाल्याने तो तिथेच कोसळला, रात्री उपचार न मिळाल्याने तिथेच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी अमित काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्मा या दोघांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. तर मृत मजुराच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे,तरी त्यात अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. दरम्यान ज्या पद्धतीने चिमूट भर तंबाखू आणि त्याच्या मोबदल्यात अर्धी बॉटल दारूसाठी एका प्रवासी मजुराच्या हत्येची घटना घडली आहे.
संबंधित बातम्या :