Love Story : 'अनारकली' मागे 'सलीम' दिवाना; बांधवगडमध्ये रंगतेय अनोखी प्रेम कहाणी, वन प्रशासनाच्या मात्र डोक्याला ताप
Bandhavgarh : मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील हत्तीणीच्या प्रेमात एक जंगली हत्ती पडला आहे, पण त्यामुळे वन विभागाच्या डोक्याला ताप झाला आहे.
भोपाळ : प्रेमाला कशाचंही बंधन नसतं, मग ते धर्म-जात असो वा वय, आणि ही गोष्ट अनेकदा सिद्ध झाली आहे. मनुष्याच्या बाबतीत असणाऱ्या या गोष्टी प्राण्यांच्याही बाबतीत लागू होतात. त्यांच्याही प्रेमाला (Love Story) कोणत्याही मर्यादा नसतात. अशीच काहीशी गोष्ट मध्य प्रदेशमधील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात (Bandhavgarh National Park) घडत असल्याचं दिसून आलं आहे. या व्याघ्र प्रकल्पातील अनारकली (Anarkali) या हत्तीणीच्या प्रेमात सलीम (Salim) हा जंगली हत्ती पडला आहे. या गोष्टीमुळे मात्र वनविभागाच्या (Forest Department) डोक्याला भलताच ताप झाल्याचं दिसून येतंय.
सलीम हा जंगली हाती या व्याघ्र प्रकल्पातील अनारकली या हत्तीणीच्या प्रेमात पडला असून तिला भेटायला तो हत्ती कॅंप परिसरात नेहमी येतो. सलीम ज्या ज्या वेळी अनारकलीला भेटतो त्या त्या वेळी तो तिला ढकलत बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. सलीमच्या या कृत्यामुळे वन प्रशासनाच्या डोक्याला मात्र चांगलाच ताप झाला असून अनारकली व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर जाणार नाही याची त्यांना सातत्याने दक्षता घ्यावी लागते.
अनारकली ही बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची हत्तीण आहे. सन 1978 साली अनारकलीला सोनपूरच्या एका जत्रेतून खरेदी करुन बांधवगडमध्ये आणण्यात आलं होतं. त्या वेळीपासून अनारकलीने या व्याघ्र प्रकल्पातील पेट्रोलिंग पासून रेस्क्यू ऑपरेशनपर्यंत अनेक कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता सलीम सोबत असलेल्या प्रेम प्रकरणामुळे अनारकली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ऑगस्ट 2018 पासून जंगली हत्तींचा एक गट बांधवगडमध्ये आला आहे, त्यांचं वास्तव्य इथंच आहे. त्या आधी या ठिकाणी एकूण 14 पाळीव हत्तींचा एक असून त्याचा वापर पेट्रोलिंग आणि रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान केला जातो. पण आता सलीम नावाचा जंगली हत्ती अनारकली या पाळीव हत्तीणीच्या प्रेमात पडल्यापासून वनविभाग मात्र चिंतेत आहे. सलीम हा व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅंपपर्यंत येतो आणि अनारकलीला ढकलत ढकलत बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. मग बाहेर गेलेल्या अनारकलीला वन विभागाचे कर्मचारी शोधून परत आणतात. आता ही घटना वारंवार घडत असल्याने या दोघांच्या प्रेमाचं काय करायचं असा प्रश्न वनविभागाला पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Viral : हाथी मेरे साथी! पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीसाठी देवदूत बनला हत्ती, पाहा कसा वाचवला जीव
- Video : आईला भेटायला हत्तीच्या पिल्लाची लगबग; वनाधिकाऱ्यांनी वाचवले प्राण