Aditya-L1 Solar Mission : सुरुवातीला होणार होता फक्त 800 किमीचा प्रवास, कशी सुरु झाली मिशन आदित्यची गोष्ट?
Aditya-L1 Solar Mission: मिशन आदित्य एल1 हे पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करुन लॅग्रेंज पाईंट 1 वरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे.
श्रीहरिकोटा : भारताची पहिली सौर मोहीम आदित्य L1 (Aditya L1) अंतराळात जाण्यासाठी सज्ज आहे. आज शनिवार (2 सप्टेंबर) रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन अंवकाश केंद्रातून या यानाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. आदित्य L1 हे पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
आदित्य एल1 हे सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये असलेल्या लॅग्रेंज पाईंट 1 वरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. पण जेव्हा ही मोहीम करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा फक्त 800 किमी अंतरच पार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) चे प्राध्यापक जगदेव सिंह यांनी माहिती दिली आहे.
कसं सुरु झालं मिशन आदित्य?
मिशन आदित्यची सुरुवात कशी झाली हा प्रश्न सर्वांना पडतो. यावर बोलताना सिंह यांनी सांगितले की, "16 फेब्रुवारी 1980 रोजी भारतात संपूर्ण सूर्यग्रहण झाले होते. त्यावेळी आयआयएचे संस्थापक-संचालक एमके वेणू बाप्पू यांनी जगदेव सिंह यांना सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले." त्यानंतर सिंह यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास सूर्याचा अभ्यास करण्यासाठी दहा मोहिमा राबवल्या. पण त्यांना अभ्यास करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या.
पंरतु ग्रहणकाळात फक्त 5-7 मिनिटंच सूर्याचा अभ्यास करता येत होता. सखोल अभ्यासासाठी हा कालावधी पुरेसा नव्हता. त्यानंतर त्यांनी इस्रो आणि इतर संस्थांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर 2009 मध्ये याविषयी चर्चा करण्यास सुरुवात झाली आणि 2012 मध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दहा वर्षांनंतर ही मोहीम पूर्णत्वाला जाणार आहे. त्यामुळे भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.
सुरुवातीला होणार होता फक्त 800 किमीचा प्रवास
जगदेव सिंह यांनी म्हटलं की, "सुरुवातीला हे यान 800 किमीचा प्रवास करणार होतं. परंतु 2012 मध्ये इस्रोशी चर्चा केल्यानंतर, लॅग्रेंज पाईंट 1 वर हे मिशन प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पृथ्वीपासून या पॉईंटचे अंतर हे 15 लाख किलोमीटर इतके आहे. याठिकाणी पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा समतोल साधला जातो."
प्लाझ्मा तापमानाचा अभ्यास करणार
जगदेव सिंह यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, "या माध्यामातून इस्रो सूर्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे. ज्यामध्ये प्लाझ्माचा देखील अभ्यास केला जाईल. प्लाझ्माचे तापमान इतके का वाढते, कोणत्या प्रक्रियांमुळे प्लाझ्मा तापमान जास्त आहे या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून होणार आहे."
हेही वाचा :
Aditya-L1 Solar Mission: चंद्रानंतर आता सूर्याची बारी, कसं पाहाल आदित्य एल1 चं थेट प्रक्षेपण?