Matchbox Price Hike : घरगुती वापरासाठीची काडेपेटीची महागणार...14 वर्षानंतर किंमतीत दुप्पटीने वाढ
Matchbox Price Hike : देशातील वाढत्या महागाईमुळे नागरिक हैराण झाले असताना आता रोजच्या वापरातील काडेपेटीही महागणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या मागची कारणं.
Matchbox Price Hike : आग लावायला तर काही शब्दही पुरेसे असतात, पण गॅस, स्टोव्ह, मेणबत्ती लावायला आपण काडेपेटीच वापरायचो. आता वेगवेगळे लायटर वगैरे आलेत. पण देवासमोर दिवा लावायला आपलं प्राधान्य हे अजूनही काडेपेटीलाच असतं. या काडेपेटीची आता किंमत वाढलीय, तीही तब्बल 14 वर्षांनी. हल्ली प्रत्येक गोष्ट एकतर शंभरी पार करतेय नाहीतर हाताबाहेर तरी जातेय. पण काडेपेटी म्हणजेच माचिस ही एक गोष्ट अशी गोष्ट आहे जी नेहमीच आपल्या आवाक्यातील आहे. त्यातल्या काड्या कमी-जास्त झाल्या पण किंमत एक रुपयाच राहिली. पण ही काडेपेटी आता एक रुपयाने महाग होणार असून 1 डिसेंबर पासून काडेपेटी दोन रुपयांना मिळणार आहे.
अश्मयुगात आग लावायला गोरगोटी वापरली जायची हे आपण इतिहासात शिकलोय. पण त्यानंतर अनेक प्रयोग होत गेले आणि 1827 साली काडेपेटी बाजारात आली. जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काडेपेटीचा शोध लावला. काडेपेटी बाजारात आली त्याला आता जवळपास 195 वर्षं झाली आहेत. फॉस्फरस, गोंद आणि जिलेटीनचा गुल असलेली काडी, पेटीला लावलेल्या मेणाच्या पृष्ठभागावर घासून आग निर्माण करते.
काडेपेटी उद्योगात वर्षाला जवळपास दीड हजार कोटींची उलाढाल होते. पण जगभर धुम्रपान विरोधी मोहीम सुरु झाली आणि या उद्योगात गेल्या दहा वर्षात 25 टक्क्यांची घट झाली. माचिस बनवणारे जवळपास आठ हजार कारखाने बंद पडले. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. पण आता पाकिस्तानमध्येही हा उद्योग सुरू झालाय आणि त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश पाकिस्तानकडून काडेपेट्या आयात करतात.
LPG Price Hike : घरगुती सिलेंडरच्या किंमतीचा भडका उडणार? पुढच्या आठवड्यात किंमती वाढण्याची शक्यता
यापूर्वी काडेपेटीच्या दरात 2007 मध्ये बदल झालेला. त्यावेळी 50 पैशाला मिळणारी काडेपेटी एक रुपयांना मिळायला लागली. आणि आता 14 वर्षांनी ही किंमत वाढून दोन रुपये झाली. देशातील पाच प्रमुख काडेपेटी उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी 1 डिसेंबरपासून काडेपेटीची किंमत एक रुपयांवरून वाढवत दोन रुपये करण्याचा निर्णय घेतला.
कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ होत आहे. कारण काडेपेटी तयार करायला साधारण 10 ते 14 प्रकारचा कच्चा माल लागतो. यातलं मेण 58 रुपयांवरून 80 रुपये झालंय. एक किलोग्रॅम लाल फॉस्फरस 425 रुपयांवरून आता 810 रुपयांना मिळतंय. बाहेरील बॉक्स बोर्ड 36 रुपयांवरून 55 रुपये तर आतील बॉक्स बोर्ड 32 रुपयांवरुन आता 58 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागतोय. कागद, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.
आता 1 डिसेंबर पासून ही माचिस म्हणजे काडेपेटी आता 2 रुपयांना मिळणार आहे. पण किंमत जरी वाढत असली तरी काड्यांची संख्याही वाढणार आहे. आत्ता एका काडेपेटीमध्ये 32 ते 36 काड्या असतात. पण दोन रुपयांना 50 काड्या मिळणार आहेत. माचिसचे 600 बॉक्स असणारे बंडल हे 270 ते 300 रुपयांना विकलं जातं. पण आता यात 60 टक्के वाढ होऊन साधारण 450 रुपयांपर्यंत ते मिळेल. यात 12 टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च सामिल नाही. नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही. एस. सेथुरथिम यांनी ही माहिती दिली आहे.
Price Rise : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार
देशात सगळ्यात जास्त काडेपेट्यांची निर्मिती तामिळनाडूत होते. तामिळनाडूचं शिवकाशी हे फटाक्यांच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. पण याच शिवकाशीमध्ये काडेपेटी बनवण्याचेही मोठे कारखाने आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या उद्योगात चार लाखांहून अधिक लोक गुंतले आहेत. यामध्ये 90 टक्क्यांहून जास्त प्रमाणात महिला आहेत. मनरेगा अंतर्गत यात अनेक लोकांना रोजगारही मिळतोय आणि चांगले पैसेही.
भारतात पहिला माचिस कारखाना गुजरातच्या अहमदाबादमध्ये 1927 साली सुरू झाला. आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे 'होम लाईट', 'शिप' हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत.
काडेपेटीचा शोध माणसासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणता येईल. यामुळे कुठल्याही प्रकारची मेहनत न करता अगदी सहजपणे आग निर्माण करता येते.
अग्नीच्या शोधामुळं मानवाच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल झाल्याचा इतिहास आहे. यामुळे मानव खऱ्या अर्थाने इतर प्राण्यांपासून वेगळा बनला आणि काडेपेटीच्या शोधाने तर मानवाला आधुनिक युगात आणलं.आता हीच काडेपेटी एक रुपयांनी महागतेय. एवढं तरी आपल्याला सहन करावंच लागेल ना.
आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक