(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक
आता मनोरंजनालाही महागाईची झळ... 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणं महागणार! चॅनेल्स पाहण्यासाठी 50 टक्के अधिक खर्च करावा लागणार
मुंबई : सातत्यानं वाढणाऱ्या महागाईनं सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. महागाईनं सामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. पेट्रोल महागलं, डिझेल महागलं, भाज्या महागल्या, मात्र आता महागाईमुळं तुम्हाला टीव्ही पाहणंही सोडावं लागण्याची शक्यता आहे. कारण आता चॅनेल्स पाहण्यासाठी 50 टक्के अधिक खर्च करावा लागणार आहे. 'ट्राय'च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किंमती वाढवण्यात येणार आहेत. ही दरवाढ 1 डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे.
देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी आणि Viacom18 ने काही चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेर काढले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढवण्यात येणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर जारी केल्या होत्या. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 जारी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या चॅनेलच्या किंमती बदलत आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (TRAI) म्हणणं होतं की, NTO 2.0 ग्राहकांना फक्त तेच चॅनेल निवडण्याचा आणि पेमेंट करण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य देईल, जे त्यांना पाहायचे आहेत.
ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या बुकेत ऑफर केलेल्या चॅनेलचे मासिक दर 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवले होते. परंतु, ट्रायच्या नव्या दरांनुसार, किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे चॅनल्ससाठी आपलं चॅनल फक्त 12 रुपयांमध्ये देणं नुकसानकारक ठरत होतं. हे नुकसान कमी करण्यासाठी, नेटवर्कनं काही लोकप्रिय चॅनल्स बुकेमधून बाहेर काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा मार्ग विचारात घेतला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळं अनेकांची आर्थिक परिस्थिती खचली आहे. अशातच सातत्यानं वाढणारी महागाई सर्वसामान्यांच्या डोक्याचा ताप झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. इंधानाचे दर वाढल्यामुळे इतर गोष्टींच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. अशातच आता चॅनल्सचे दरही वाढल्यामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणंही महागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :