मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, खासदार सुनील तटकरेंची संसदेत मागणी
मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्रात पाठपुरावा करु, असं आश्वासन वारंवार दिलं गेलं आहे. या आधीही काही खासदारांनी हा मुद्दा मागच्या टर्ममधे उपस्थित केला होता.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी आज लोकसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती त्यांनी सरकारला केली.
लोकसभेत शून्य प्रहर यामध्ये त्यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली. शिवाय आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर मराठी वार्तापत्र पुन्हा सुरू करण्यात यावे, ही देखील मागणी त्यांनी यावेळी केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मराठी भाषेत खासदारांनी शपथ घ्यावी यासाठी मोहीम सुरू होती. मराठी शपथ हे सोबतच भाषेचे जे काही प्रश्न आहेत ते देखील खासदारांनी उपस्थित करणं गरजेचं आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्रात पाठपुरावा करु, असं आश्वासन वारंवार दिलं गेलं आहे. या आधीही काही खासदारांनी हा मुद्दा मागच्या टर्ममधे उपस्थित केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकजुटीने याबाबत काही आवाज उठवला जाणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असेल.
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर नेटीझन्सने केली होती. यासाठी #मराठीतशपथ हा हॅशटॅग वापरुन नेटीझन्स अनेक पोस्ट ट्विटरवर शेअर केल्या होत्या. या मोहिमेला 'एबीपी माझा'ने देखील पाठिंबा दिला होता. मराठीत अभिजात दर्जाच्या आग्रहासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.
आणखी वाचा