(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान म्हणाले, कृषी कायद्यांमुळं शेतकऱ्यांना नवे अधिकार, धुळ्याच्या जितेंद्र भोईंचं दिलं उदाहरण
एकीकडे शेतकरी आंदोलन पेटलं असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे म्हटलं आहे. मन की बात या कार्यक्रमात शेतकरी कायदे कसे फायद्याचे आहेत हे सांगताना मोदींनी धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोईंचं उदाहरण दिलं.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. एकीकडे शेतकरी आंदोलन पेटलं असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे म्हटलं आहे. मन की बात या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलंय की, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या आज पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोईंचं उदाहरण दिलं शेतकरी कायदे कसे फायद्याचे आहेत हे सांगताना मोदींनी धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोईंचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी, जितेंद्र भोई यांनी या नव्या कृषी कायदयाचा वापार कसा केला ते पाहू. त्यानी शेतात मका लावला आणि उत्तम किंमत मिळावी म्हणून तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचे निश्चित केले. पिकाची एकूण किंमत 3,32,000 इतकी निश्चित झाली. जितेंद्र भोई यांना 25,000 रुपये आगावू रक्कम म्हणून मिळाले. ठरलं असं होतं की उरलेले पूर्ण पैसे त्यांना पंधरा दिवसांत दिले जातील. मात्र नंतर अशी काही परीस्थिती निर्माण झाली, की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत.
'अंजिठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार', पंतप्रधान मोदींची Mann ki Baat मध्ये घोषणा
मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा मात्र महिनोन्महिने त्यांचे पैसे चुकवायचे नाहीत,या परंपरेने ते ही वागत होते. अशाप्रकारे 4 महिन्यांपर्यंत जितेंद्रजी यांचे पैसे मिळालेच नाहीत. अशा स्थितीत, केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले, ते कामी आले. या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे, की शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील. आणि जर पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो. जितेंद्रजी यांनी तक्रार केली आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले. कायद्याची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ जितेंद्रजी यांची ताकद झाली. क्षेत्र कुठलेही असो, त्या प्रत्येक क्षेत्रात, भ्रम आणि अफवांपासून दूर राहत योग्य आणि खरी माहिती ही खूप मोठी शक्ती असते, असं मोदी म्हणाले.