Manipur Violence : मणिपूर पुन्हा हिंसेच्या दिशेने, अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, 5 दिवसांसाठी इंटरनेट बंद
Manipur Violence Internet Ban : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली असून राज्यातील इंटरनेट डेटा पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंफाळ : गेल्या वर्षभरापासून धगधगत असलेल्या मणिपूर पुन्हा एकदा हिंसेच्या दिशेने जात असून राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी (10 सप्टेंबर) राज्यात इंटरनेट आणि मोबाइल डेटावर पाच दिवस बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूर सरकारच्या निर्णयानुसार राज्यात 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल डेटा बंद राहणार आहे.
मणिपूर सरकारने इंटरनेट आणि मोबाईल डेटा बंद करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. नोटीसमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणाले की, "सरकारने केवळ सोशल मीडियाद्वारे द्वेषयुक्त भाषणे पसरवण्यापासून आणि हिंसाचाराला चिथावणी देण्यापासून गैरप्रकारांना रोखण्यासाठी इंटरनेटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे."
याआधी मणिपूर सरकारने राज्यातील अनियंत्रित परिस्थितीवर RAF पाचारण केलं असून कर्फ्यू लागू करण्याचा निर्णयही घेतला होता.
Manipur government suspends internet services in state till September 15
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2024
Read @ANI Story | https://t.co/uwIFiDSy2o#Manipur #internetservices #ManipurVoilence pic.twitter.com/Acefk34Grt
मणिपूरच्या घडामोडींबद्दल मोठ्या गोष्टी
1. सोशल मीडियावर घृणास्पद चित्रे, भाषणे आणि व्हिडीओ प्रसारित होऊ नयेत यासाठी गृह विभागाने इंटरनेटवर निर्बंध लादण्याचा मोठा निर्णय घेतला.
2. अधिसूचनेत म्हटले आहे की मणिपूरमध्ये लीज्ड लाइन, VSAT, ब्रॉडबँड आणि VPN सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
3. मंगळवारी (10 सप्टेंबर) आंदोलकांनी राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आणि महिला आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. डीजीपी आणि मणिपूर सरकारच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.
4. खवैरामबंद महिला बाजारामध्ये छेडछाड होत असल्या कारणाने शेकडो विद्यार्थिनींनी बीटी रोड मार्गे राजभवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलांनी त्यांना काँग्रेस भवनाजवळ रोखले.
5. मंगळवारी (10 सप्टेंबर), इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू केला.
6. कर्फ्यू दरम्यान, आरोग्य, अभियांत्रिकी विभाग, नगरपालिका संस्था, वीज, पेट्रोल पंप, न्यायालयांचे कामकाज, हवाई प्रवासी आणि माध्यमांसह इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांना सूट देण्यात आली.
7. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मणिपूरमध्ये ड्रोन आणि हाय-टेक क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर अत्याधुनिक रॉकेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. आसाम रायफल्सचे निवृत्त डीजी, लेफ्टनंट जनरल पीसी नायर यांचा ड्रोन किंवा रॉकेट वापरण्यात आला नसल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. मणिपूर पोलिसांना मैतेई पोलीस म्हणावे असं निवृत्त डीजी लेफ्टनंट जनरल पीसी नायर या अधिकाऱ्याने वक्तव्य केल्यानंतर बराच गदारोळ झाला होता.
8. आयजीपी (प्रशासन) जयंत सिंह यांनी माध्यमांशी बोलताना निवृत्त डीजी लेफ्टनंट जनरल पीसी नायर यांची टिप्पणी अकाली असल्याचे म्हटले आणि ते फेटाळले. जयंत सिंह म्हणाले, 'ड्रोन आणि हायटेक क्षेपणास्त्र हल्ल्यांचे पुरावे मिळाले आहेत. एका प्रतिष्ठित सेनापतीने असे विधान करणे दुर्दैवी आहे.
9. IGP (Operations) IK Muivah यांनीही 'मैतेई पोलिसांच्या' आरोपावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, 'आम्ही या विधानाचे खंडन करतो. मणिपूर पोलिसांमध्ये विविध समुदायातील लोकांचा समावेश आहे.
10. इम्फाळ खोऱ्यात राहणारे मैतेई समुदाय आणि डोंगराळ भागात राहणारे कुकी समुदाय यांच्यातील वांशिक संघर्षाने मे 2023 मध्ये गंभीर स्वरूप धारण केले. या हिंसाचारात 200 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो लोक बेघर झाले.
ही बातमी वाचा: