कोणत्याच देशाला झाकीर नाईक आपल्याकडे नकोय, मलेशियाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य
मलेशियामधील हिंदूंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मलेशिया सरकारने झाकीर नाईकच्या भाषणावर बंदी घातली आहे.
नवी दिल्ली : वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक संदर्भात मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. झाकीर नाईकला कोणताही देश आपल्याकडे ठेऊ इच्छित नाही, असं महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.
मलेशियाची मीडिया रिपोर्ट्सनुसार, झाकीर नाईकला भारतात कधी पाठवलं जाणार असं पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की, "अनेक देशांना झाकीर नाईक आपल्याकडे नकोय. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो, मात्र झाकीर नाईकबद्दल चर्चा झाली नाही. झाकीर नाईक भारतासाठी धोकादायक आहे."
झाकीर नाईक मलेशियाचा नागरिक नाही. मागील सरकारने त्याला मलेशियामध्ये राहण्याची परवानगी दिली आणि स्थायी निवासी असा दर्जा दिला होता. मात्र त्यामुळे झाकीर नाईकला मलेशियातील राजकारण आणि यंत्रणेवर बोलण्याचा अधिकार नाही, असं महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.
मलेशियामधील हिंदूंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मलेशिया सरकारने झाकीर नाईकच्या भाषणावर बंदी घातली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर झाकीर नाईकने मलेशियात आसरा घेतला होता. झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
झाकीर नाईकवरील आरोप
झाकीर नाईकवर तरुणांना दहशतवादी कारवायांना प्रवृत्त करणं, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, प्रक्षोभक भाषण करणं, असे आरोप आहेत. याशिवाय ईडीनेही त्याच्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परदेशातून फंड गोळा करुन तो दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा आरोप आहे.
झाकीर नाईकच्या प्रवचनांमुळेच मुंबईतील चार तरुण आयसीसमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे. झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर आधी बांगलादेशने मग भारताने बंदी घातली आहे. बांगलादेशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटातील अतिरेकी झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रवृत्त झाला होता.
झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. तर इंग्लंड, कॅनडा आणि मलेशियासह पाच देशांनीही त्याच्यावर बंदी घातली आहे. एनआयएने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
संबंधित बातम्या
तरुणांची माथी भडकवणारा झाकीर नाईक मलेशियात सापडला
मुंबई : झाकीर नाईकच्या याचिकेवर हायकोर्टाचा संताप
अलीगढच्या इस्लामिक स्कूलमधील पाठ्यपुस्तकात झाकिर नाईक ‘हिरो’
अलीगढच्या इस्लामिक स्कूलमधील पाठ्यपुस्तकात झाकिर नाईक ‘हिरो’