एक्स्प्लोर
मराठीजनांची दिल्लीवर स्वारी, राजधानीत भव्य मराठी कार्यक्रम
महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्सव जोरात साजरा होतोच, पण राजधानी दिल्लीत प्रथमच हा सोहळा भव्यदिव्य प्रमाणावर साजरा होणार आहे.
नवी दिल्ली : मराठीजनांनी दिल्लीवर स्वारी केली की काय, असा प्रश्न पडावा इतके भव्य सांस्कृतिक कार्यक्रम देशाच्या राजधानीत पुढच्या महिनाभराच्या कालावधीत होणार आहेत. 19 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत प्रथमच भव्य शोभायात्रा काढून राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी होत आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचं दर्शन घडवणारा महापारायण सोहळा 11 ते 18 मार्चच्या दरम्यान होणार आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं दिल्लीतल्या रामलीला मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 50 ते 60 हजार वारकरी दाखल होतील असा दावा केला जात आहे.
6 एप्रिल ते 10 एप्रिल या काळात दिल्लीत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं जाणता राजा हे महानाट्य सादर होणार आहे. या तीनही कार्यक्रमांची सध्या दिल्लीत जोरदार तयारी सुरु आहे. यानिमित्तानं मराठी संस्कृतीची पताका राजधानीत फडकताना दिसत आहे.
19 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिवजयंती
महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्सव जोरात साजरा होतोच, पण राजधानी दिल्लीत प्रथमच हा सोहळा भव्यदिव्य प्रमाणावर साजरा होणार आहे. शोभायात्रेत पुण्याच्या तीनशे कलाकारांचं स्वराज्य ढोलपथक, दोनशे जणांची वारकरी दिंडी, वीस जणांचं शाहिरी पथक, ऐंशी कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, धनगरी ढोल पथक असा सगळा थाट असणार आहे.
सकाळी दहा वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महाराष्ट्र सदनापासून राजपथ मार्गे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा निघणार आहे. संध्याकाळी 6 वाजता शिवमूर्तीस अभिवादनाचा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे त्यास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्करप्रमुख बिपीन रावत हे हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाला दिली. हा सोहळा संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातच शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे.
रामलीलावर जमणार वारकऱ्यांचा महासागर
अखिल भारतीय वारकरी मंडळ व दिल्लीकर मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 18 मार्च महापारायण सोहळा होणार आहे. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर त्यासाठी 50 ते 60 हजार वारकरी उपस्थित राहतील असा दावा वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांनी केला.
स्वागताध्याक्ष म्हणून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी बाबा रामदेव, योगी आदित्यनाथ यांनाही बोलावण्याची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातले कीर्तनकार तर या हजेरी लावतीलच, पण काही हिंदी भाषिक कीर्तनकारांनाही यात स्थान देण्यात आलं आहे.
लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जाणता राजा
जाणता राजा या महानट्याचे प्रयोग महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर अनेकदा झाले आहेत. पण ज्या लाल किल्ल्याच्या भिंतींनी शिवरायांच्या नावाचा दरारा प्रत्यक्ष अनुभवला असेल, त्या लाल किल्ल्याच्या समोर पहिल्यांदाच शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा कार्यक्रम पार पडेल.
महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना शिवराय कळावेत यासाठी हिंदीतून हे नाट्य रुपांतरित करण्यात आलं आहे. 6 ते 10 एप्रिल या काळात या महानाट्याचं आयोजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावावी यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement