Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Inder Singh Parmar : मध्य प्रदेशातील इंदर सिंह परमार यांनी समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन माफी मागतिली आहे.

भोपाळ : महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय (Raja Ram Mohan Roy) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्र्यानं माफी मागितली आहे. मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांनी शनिवारी राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राजा राममोहन रॉय हे इंग्रजांचं दलाल असल्याचं वक्तव्य इंदर सिंह परमार यांनी केलं होतं. परमार यांच्या या वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद वाढल्यानंतर परमार यांनी एक व्हिडिओ जारी करुन केलेलं वक्तव्य चुकीचं होतं, चुकून बोलून गेलो, असं म्हणत माफी मागितली.
Inder Singh Parmar Apology : भाजप मंत्र्याचा माफीनामा
परमार म्हणाले, राजा राममोहन रॉय एक समाजसुधारक होते. त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. चुकून माझ्या तोंडातून ते वाक्य निघालं, ज्यासाठी मला खूप दु:ख होतंय. मी त्याचा पश्चाताप होतोय. परमार म्हणाले की त्यांचा हेतू कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीचा अपमान करण्याचा नव्हता.
इंदर सिंह परमार यांनी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीवेळी आगरा मालवा येथे आयोजित एका कार्यक्रमात राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
परमार यांनी म्हटलं की राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांचे दलाल होते. त्यांनी देशात एक दलाल म्हणून काम केलं. रॉय यांनी धर्मांतराचं दुष्टचक्र सुरु केलं. इंग्रजांनी इथं काही लोकांना बनावट समाजसुधारक म्हणून समोर आणलं आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्यांना पुढं ठेवलं, असं परमार म्हणाले होते.
धर्मांतर थांबवणं आणि आदिवासींचं संरक्षण करण्याचं जर कोणामध्ये धाडस होतं तर ते बिरसा मुंडा यांच्यात होतं. परमार म्हणाले ब्रिटीश काळात मिशनरी शाळा या शिक्षणसंस्था होत्या. त्या शिक्षणाचा वापर धर्मांतरासाठी करत होते. मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री परमार यांनी बिरसा मुंडा यांनी हे ओळखून आपल्या समुदायासाठी ब्रिटीश शासनाविरुद्ध लढण्यासाठी मिशनरी शिक्षण सोडलं होतं.
राजा राममोहन रॉय कोण होते?
राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 ला बंगालच्या राधानगरमधील कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला होता. इतिहासकारांच्या मते राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक आणि समाजसुधारक म्हटलं जातं.तर, राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1833 ला झाला. तर, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 ला झाला तर मृत्यू 9 जून 1900 रोजी झाला होता.

























