Lumpy Skin Disease : देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट
देशात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींनी या आजाराची लागण झाली आहे.
Lumpy Skin Disease : दिवसें दिवस लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. त्यामुळं देशातील पशुपालक चिंतेत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा कहर वाढत आहे. देशातील 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध राज्ये उपाययोजना करत आहेत. सध्या लम्पीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचे दिसत आहे.
राजस्थान आणि गुजरातमध्ये लम्पी स्कीनचा कहर
मिळालेल्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रसार झाला आहे. तर गुजरातच्या 33 पैकी 26 जिल्ह्यांमध्ये या संसर्गाने कहर केला आहे. तर पंजाबमधील 23 जिल्हे आणि हरियाणातील सर्व 22 आणि उत्तर प्रदेशातील 21 जिल्हे याच्या विळख्यात आले आहेत. लम्पी आजारामुळं गाई पालनातून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलं आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे दुधाचीही टंचाई निर्माण होत आहे.
लम्पी आजापासून वाचण्यासाठी लसीकरण सुरु
बाधित राज्यांची सरकारे पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. कारण हा संसर्ग पसरण्याचे कारण केवळ पावसामुळेच असल्याचे सांगितले जात आहे. पाऊस संपल्याने डास कमी होतील आणि लम्पीचा कहरही कमी होईल असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. गायींना या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण केलं जात आहे.
दुधाच्या उत्पादनात मोठी घट
लम्पीची लागण होताच गायींची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे. तर काही ठिकाणी पूर्णपणे दुधाचा पुरवठा बंद होत आहे. राजस्थानातील सर्वाधिक लम्पी बाधित पाच जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन 30 टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर गुजरातमधील दूध उत्पादनावर 10 टक्के परिणाम झाला आहे. तर पंजाबमध्ये दुधाचे उत्पादन 7 टक्क्यांनी घटले आहे. दरम्यान, पुरवठा कमी झाल्यानं दूध संघांनी दुधाच्या दरात दोन ते चार रुपयांची वाढ केली आहे.
महाराष्ट्रात 17 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव
राज्यात लम्पी स्कीन या आजाराचा शिरकाव हा गुजरात आणि राजस्थान या राज्यातून झाला आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Radhakrishna Vikhe Patil : जनावरांच्या लसीकरणाबाबत युद्ध पातळीवर उपाययोजना राबवा, पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांच्या सूचना
- Lumpy Skin Disease : लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी