India Weather Update: उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा, तर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गारठा कायम
उत्तर भारतात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव ओसरताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे.
India Weather Update : वातावरणात झालेल्या बदलामुळे लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये आता थंडी कमी होत आहे. उत्तर भारतात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव ओसरताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतासह उत्तर पश्चिम आणि डोंगराळ भागात किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, पंजाबपासून ते हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी धुके पडत आहे. या भागामध्ये आणकी दोन ते तीन दिवसांमध्ये हवामान आणखी स्वच्छ होणाचा अंदाज होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गारठा अद्याप कायम आहे.
महारष्ट्रात तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. थंडीचा जोर कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातील काही ठिकाणी आणि उत्तर महारष्ट्रात काही ठिकाणी अद्यापही गारठा जाणवत आहे. पुढचे चार ते पाच दिवस राज्यातील तापमान कोरडे रहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी किमान तापमान नऊ अंश आणि कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7.20 वाजता दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक 219 होता. जो खराब श्रेणीत येतो. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आज हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. दुसरीकडे राज्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पंजाबमध्ये आज बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 8 अंश, तर कमाल तापमान 25 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राजस्थानमध्ये थंडी कायम, तर बिहारमध्ये पावसाची शक्यता
राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी थंडीचा कडाका सुरूच आहे. पण दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसा कडक सूर्यप्रकाश पडत आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 25 ते 26 अंश, तर किमान तापमान 12 ते 14 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील अनेक शहरांमध्ये सकाळी दाट धुके असण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या सकाळी आणि रात्री दाट धुके पडू शकते. तर 18 फेब्रुवारी रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. अनेक भागात हलक्या पावसाचीही शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हिमाचलमध्ये दुपारी बर्फवृष्टी झाली असून, त्यामुळे तापमानात घट झाली आहे. दुसरीकडे, हिमाचलमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 2 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 16 अंशांपर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी, हिमाचलच्या अनेक भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची प्रक्रिया सुरू राहू शकते. तर जम्मू-काश्मीरच्या हवामानात आजपासून मोठा बदल झाला आहे. जम्मू विभागात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. परंतु भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) मते, काश्मीर विभागात गेल्या दिवसापासून पाऊस आणि बर्फवृष्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे, जी अनेक दिवस चालेल. जम्मूमध्ये आज कमाल तापमान 20 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 7 अंशांपर्यंत राहू शकते.