Mumbai Attacks : मुंबईतील 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू, पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद
Lashkar-e-Taiba : 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तयार करणाऱ्या लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक सदस्याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे.
26 /11 Mumbai Attacker Dead in Pakistan Jail : मुंबईतील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा (Mumbai Terrorist Attack) कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा (Abdul Salam Bhuttavi ) मृत्यू झाला आहे. तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता. लष्कर-ए-तोएबा (Lashkar-e-Taiba) दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. अब्दुल सलाम भुट्टावी 78 वर्षांचा होता. अब्दुल सलाम भुट्टावी 2020 पासून टेरर फंडीग प्रकरणी म्हणजेच दहशवतवादाला आर्थिक खतपाणी घालण्यासाठी शिक्षा भोगत पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता.
संयुक्त राष्ट्र संघाने 2012 मध्ये, अब्दुल सलाम भुट्टावीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. त्यानंतर त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. य प्रकरणात लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याच्यासह अब्दुल सलाम भुट्टावीला न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये अब्दुल सलाम भुट्टावीला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या तुरुंगात होता.
हाफिज सईदचा उजवा हात भुट्टावी
2008 साली मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावीनं 2002 आणि 2008 मध्ये लष्कर-ए-तोएबाचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. लष्करशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुट्टावीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. भुट्टावीचं सोमवारी दुपारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
मुंबई हल्ल्यात भुट्टावीची महत्त्वाची भूमिका
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यामध्ये अब्दुल भुट्टीवीचाही हात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना भुट्टीवीनं प्रशिक्षण दिलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, हाफिज सईदच्या अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावी लष्कर-ए-तोएबाचा म्होरक्या होता. 2011 मध्ये भुट्टावीनं स्वत: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबासाठी 20 वर्षे काम केल्याची कबुली दिली होती. नोव्हेंबर 2008 मध्ये लष्कर-ए-तोएबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले केले होते. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांतील एकूण 166 लोकांचा मृत्यू झाला होता.
भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांकडून भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा
लष्कर-ए-तोएबाशी संबंधिता संघटनांनी भुट्टावीच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. मंगळवारी सकाळी लाहोरजवळील मुरीदके येथील लष्कराच्या मरकजमध्ये भुट्टीवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनीही अब्दुल सलाम भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.