Lal Bahadur Shastri Jayanti : अत्यंत साधेपणाने जीवन जगणाऱ्या लाल बहादुर शास्त्री यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?
Lal Bahadur Shastri Jayanti : देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा देऊन जवानांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला. त्यांची आज 118 वी जयंती साजरी केली जात आहे.
Lal Bahadur Shastri Jayanti : देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज 118 वी जयंती. चीनच्या युद्धानंतर निर्माण झालेल्या अत्यंत बिकट परिस्थितीत लाल बहादुर शास्त्रींच्या हातात देशाची सत्ता आली. आपल्या छोट्या कारकीर्दीत त्यांनी उल्लेखनीय कार्य करुन एक वेगळाच ठसा उमटवला. 'जय जवान, जय किसान' हा नारा देऊन जवानांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला.
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील मुगलसराय या ठिकाणी झाला. लाल बहादुर शास्त्रींवर गांधीवादाचा मोठा प्रभाव झाला होता. अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य जगलेल्या लाल बहादुर शास्त्रींच्या जीवनाशी संबंधित दहा महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया.
1. लाल बहादुर शास्त्रींनी अत्यंत बिकट परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. लहान असताना ते नदीमध्ये पोहत पलिकडे असलेल्या शाळेला जायचे.
2. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी आपले शिक्षण बंद केलं आणि गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत भाग घेतला.
3. लाल बहादुर शास्त्रींचा विवाह 1928 साली ललिता शास्त्री यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुली आणि चार मुलं अशी सहा अपत्यं होती.
4. असहकार आंदोलन ते भारत छोडो आंदोलन, अशा प्रत्येक आंदोलनात लाल बहादुर शास्त्रींनी भाग घेतला.
5. लाल बहादुर शास्त्रींनी नेहरुंच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री, परिवहन मंत्री, वाणिज्य मंत्री, उद्योग मंत्री, गृहमंत्री अशी विविध पदं भूषवली.
6. लाल बहादुर शास्त्री पंतप्रधान असताना 1965 साली भारताला पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं. लाल बहादुर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली अत्यंत कठीण परिस्थितीत भारताने पाकिस्तानला धुळ चारली.
7. देशातील जनतेला लष्कर आणि शेतीचं महत्व समजवण्यासाठी त्यांनी 'जय जवान, जय किसान' असा नारा दिला.
8. पाकिस्तानसोबतच्या युद्धाच्या वेळी देशात अन्नधान्यांची चणचण भासू लागली होती. त्यावेळी लाल बहादुर शास्त्रींनी आपलं वेतन घेण्यास नकार दिला होता. तसेच देशातील जनतेला दिवसातून एक वेळ उपवास करण्याचं आवाहन केलं होतं.
9. रशियाच्या दौऱ्यावर असताना ताश्कंद या ठिकाणी 11 जानेवारी 1966 रोजी त्यांचं निधन झाले. 10 जानेवारी 1966 रोजी भारताने पाकिस्तानसोबत शांतता करार केला. त्यानंतर दहा तासातच लाल बहादुर शास्त्री यांचा अचानक मृत्यू झाला.
10. लाल बहादुर शास्त्री यांनी आयुष्यभर गांधीवादावर विश्वास ठेवला. त्यामुळे ते आपले जीवन अत्यंत साधेपणाने जगले.
संबंधित बातम्या :
- Gandhi Jayanti 2021 : 'गांधीजींना आठवताना....'; गांधींजींचे महत्वाचे दहा विचार आपल्याला काय सांगतात?
- Gandhi Jayanti : महात्मा गांधी केवळ 'देशभक्त', शांतीचे दूत नाहीत? पाच वेळा नामांकन होऊनही गांधींना शांतीचा नोबेल का नाकारण्यात आला?
- Gandhi Jayanti: नोटांवर गांधीजींचाच फोटो का? कधीपासून वापरतात फोटो? काय आहे त्याचा इतिहास