Gandhi Jayanti : महात्मा गांधी केवळ 'देशभक्त', शांतीचे दूत नाहीत? पाच वेळा नामांकन होऊनही गांधींना शांतीचा नोबेल का नाकारण्यात आला?
Gandhi Jayanti : महात्मा गांधींचे नाव शांतीच्या नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize) तब्बल पाच वेळा सूचवण्यात आलं होतं. पण पाचही वेळा वेगवेगळी कारणं देत त्यांना हा पुरस्कार नाकारण्यात आला.
Gandhi Jayanti : आज देशात महात्मा गांधींची 152 वी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघांने हा दिवस 'जागतिक अहिंसा दिवस' म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी गांधीजींनी सातत्याने प्रयत्न केले. महात्मा गांधींनी अहिंसेच्या शस्त्राच्या आधारे इंग्रजांना या देशातून हाकलून लावलं. गांधीजींच्या याच विचारांचा प्रभाव मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर आणि नेल्सन मंडेला तसेच जगभरातल्या अनेक नेत्यांवर पडला. महात्मा गांधी हे 20 व्या शतकातील अहिंसेचे सर्वात मोठे प्रतीक होते आणि त्याच कारणामुळे त्यांचे तब्बल पाच वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize) नॉमिनेशन करण्यात आलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शांतीच्या या सर्वोच्च दूताला एकदाही शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही.
महात्मा गांधीचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य तसेच अहिंसेच्या मार्गाने भारतात सुरु केलेल्या अनोख्या लढाईची दखल घेऊन 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 या वर्षी शांतीच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं होतं.
1937 साली पहिल्यांना नामांकन
Nobelprize.org या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 1937 साली पहिल्यांदा महात्मा गांधींचे नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सूचवण्यात आलं होतं. हे नाव नॉर्वेचे खासदार ओले कोल्बजॉर्नसन यांनी सूचवलं होतं. ते स्वत: नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य होते. पण याच समितीचे आणखी एक सदस्य असलेले जेकब वॉर्म मूलर यांच्या गांधीजींच्या बाबतीत असलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना पुरस्कार मिळाला नाही.
जेकब वॉर्म मूलर यांनी लिहिलंय की, "गांधी निश्चितच एक महान व्यक्ती आहेत. भारतीय जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. पण गांधी आपल्या अहिंसेच्या मुद्द्यावर कायम राहत नाहीत. त्यांचे ब्रिटिशांविरोधात सुरु असलेले आंदोलन कधीही हिंसक रुप धारण करु शकते. गांधींचे आंदोलन केवळ भारतीयांपुरतेच असते. दक्षिण आफ्रिकेतही त्यांचे आंदोलन हे केवळ भारतीयांपुरतेच मर्यादित होतं. गांधींनी गोऱ्या लोकांच्यासाठी कधीही आवाज उठवला नाही."
1937 आणि 1938 साली नाव शॉर्टलिस्ट नाही
नॉर्वेचे खासदार ओले कोल्बजॉर्नसन यांनी पुन्हा म्हणजे 1938 आणि 1939 साली असं दोनदा शांतीच्या नोबेलसाठी गांधींचे नाव सूचवलं होतं. पण समितीने त्या वर्षी गांधींचे नाव शॉर्टलिस्टच केलं नाही.
'गांधीजी केवळ देशभक्त, शांतीचे दूत नाहीत'
त्यानंतर 1947 साली भारतातून गांधींचे नाव नोबेल पुरस्कारासाठी सूचवण्यात आलं होतं. हे काम गोविंद वल्लभ पंत, गणेश मावळणकर यांनी सूचवलं होतं. या वेळी नोबेल समितीचे प्रमुख असलेले गुन्नर जॉन यांनी आपल्या डायरीमध्ये नोंद केलं होतं की, "समितीच्या काही सदस्यांकडून या बाबतीत सकारात्मकता आहे. पण सर्व सदस्यांची याला मान्यता नाही. पाकिस्तानशी संबंध बिघडल्यानंतर गांधीजी म्हणाले होते की, मी युद्धाच्या विरोधात आहे. पण पाकिस्तानच्या हट्टी वागण्यामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे भारताला युद्ध करावं लागेल."
महात्मा गांधींच्या या वक्तव्याला युद्धाचे समर्थन करणारे मानण्यात आलं आणि 1947 साली त्यांना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला. गांधीजी शांततेचे दूत नाहीत तर केवळ एक देशभक्त आहेत असं नोबेल समितीने नोंद केली होती.
1948 साली प्रबळ दावेदार
शेवटच्या वेळी म्हणजे 1948 साली गांधीजींचे नाव नोबेल शांती पुरस्कारासाठी सूचवण्यात आलं होतं. गांधींना शांततेचे नोबेल मिळावे म्हणून समितीला एकूण सहा पत्र मिळाली होती. पण नॉमिनेशनच्या शेवटच्या तारखेच्या आधी दोन दिवस गांधीजींची हत्या करण्यात आली.
यावेळी गांधीजी नोबेल पुरस्काराचे सर्वाधिक प्रबळ दावेदार होते. पण त्या आधीच त्यांची हत्या झाल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला नोबेल पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती. काही अपवादात्मक स्थितीमध्ये हे शक्य झाले असते, पण गांधीजी कोणत्याही संघटनेशी जोडले गेले नव्हते किंवा त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले नव्हते. त्यामुळे या पुरस्काराचे पैसे कोणाला द्यायचे हा प्रश्न नोबेल समितीसमोर उपस्थित झाला होता.
गांधीजींना पुरस्कार न देणे ही मोठी चूक
महात्मा गांधीजींना शांतीचे नोबेल न देणं ही समितीची सर्वात मोठी चूक असल्याचं नोबेल समितीनं जाहीर केलं आहे. 1989 साली ज्यावेळी दलाई लामा यांना शांततेचे पुरस्कार देण्यात आलं होतं त्यावेळी या समितीच्या अध्यक्षांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. महत्वाचं म्हणजे गांधींजींच्या विचारावर चाललेल्या मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर आणि नेल्सन मंडेला यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला.
महात्मा गांधीजींना जरी नोबेल पुरस्कार मिळाला नसला तर त्यांच्या विचारावर चालणाऱ्यांना म्हणजेच एका अर्थाने त्यांच्या विचारांनाच शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. हा गांधीवादाचा सन्मान आहे.
संबंधित बातम्या :