Gandhi Jayanti: नोटांवर गांधीजींचाच फोटो का? कधीपासून वापरतात फोटो? काय आहे त्याचा इतिहास
mahatma gandhi jayanti : आपल्या भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो वापरला जातो. हा फोटो का वापरला जातो? कधीपासून वापरला जातो आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात...
Gandhi Jayanti 2021 : देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. आपल्या भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो वापरला जातो. हा फोटो का वापरला जातो? कधीपासून वापरला जातो आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात...
नोटांवर केवळ गांधीजीच का?
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात. भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. जगातील निवडक देशांच्या चलनावर विश्वास ठेवला जातो, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. जवळपास प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचं प्रतिनिधित्व करतो.
1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात
मात्र भारतीय नोटांवर पहिल्यापासून गांधीजींचाच फोटो होता असं नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. 1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं. त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.
नोटांवरील गांधीजींचा फोटो नेमका कुठला?
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय नोटांवर कोणत्याही भारतीय व्यक्तींचा फोटो नव्हता. भारत पारतंत्र्यात असल्याने कोणाचाही फोटो नव्हता. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो होता. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो छापणं बंद झालं. भारतीय नोटेवर देशातील विविधतेचं दर्शन आहे. प्रत्येक मैलावर बदलणाऱ्या भाषांना नोटांवर स्थान देण्यात आलं आहे. देशातील 15 भाषांमध्ये त्या त्या नोटेचं मूल्य लिहिलेलं असतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)