संजय राऊतांचा सोमय्या पिता-पुत्रांवर हल्लाबोल; आरोपांवर आज सोमय्या दिल्लीत प्रत्युत्तर देणार
Kirit Somaiya Press Conference On Sanjay Raut : किरीट सोमय्या आणि राकेश वाधवान यांचे आर्थिक संबंध असून निकॉन कंपनी सोमय्यांचीच असल्याचा राऊतांचा दावा तर आरोपांच्या चौकशीसाठी तयार, किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर
Kirit Somaiya Press Conference On Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असा केला. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, ईडीच्या (ED) धाडी पडणार, असंही राऊत म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सोमय्यांनी ते 19 बंगले दाखवावं नाही तर शिवसैनिक जोड्यानं मारतील असा इशारा दिला आहे. अशातच आज सकाळी राऊतांच्या आरोपांना उत्तरं देण्यासाठी साडेनऊ वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्या किरीट सोमय्या दिल्लीत असून दिल्लीतून पत्रकार परिषद येणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे दिल्लीमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत.
त्याआधी दुपारी यावर किरीट सोमय्या यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर अजून तीन तीन खटले पाईपलाईनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचं स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही."
काय म्हणाले संजय राऊत?
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या दलाल असल्याचा आरोप
खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याविषयी बोलताना म्हणाले की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असं घाणेरडे राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kirit Somaiya : राऊतांनी केलेल्या आरोपावर चौकशीसाठी तयार; किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
- Sanjay Raut: PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करा: संजय राऊत
- Sanjay Raut PC 10 Points: पीएमसी बँक घोटाळा ते केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप... संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे
- आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!, अमृता फडणवीसांचा राऊतांवर निशाणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha