बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारात 3,300 जवान जखमी
श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 3,300 जवान जखमी झाले आहेत. मागच्याच महिन्यात 8 जुलै रोजी चकमकीदरम्यान बुरहान वानीला कंठस्नान घालण्यात आलं होतं.
जुलै 2016 पासून जम्मू-काश्मीर पोलिस आणि पॅरामिलिटरी फोर्सचे 3,329 जवान शांतता आणि सुव्यवस्था राखताना जखमी झाले आहेत. यात काही जवानांना गंभीर दुखापतही झाली आहे, असं पोलिस दलाच्या प्रवक्त्याने सांगितलं. बुरहान वानीच्या खात्म्यानंतर 1,109 हिंसक आंदोलनं झाली, यात पोलिस दलातील 2 जवान शहीद झाले.
बुरहान वानी हा अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. बुरहान वानी वयाच्या पंधराव्या वर्षीच दहशतवादी बनला होता. त्याचा मोठा भाऊ खालिद मुजफ्फरही दहशतवादी होता, ज्याला मागच्याच वर्षी मारण्यात सुरक्षादलांना यश आलं होतं. मात्र बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकला होता.