#JNUviolence : मास्कधारी चेक्स शर्ट असणाऱ्या मुलीची ओळख पटली; दिल्ली क्राईम ब्रान्चची माहिती
राजधानी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला हल्यात सहभागी असणाऱ्या मास्कधारी हल्लेखोरांपैकी चेक्स शर्ट घातलेल्या मुलीची ओळख पटली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला हल्यात सहभागी असणाऱ्या मास्कधारी हल्लेखोरांपैकी चेक्स शर्ट घातलेल्या मुलीची ओळख पटली आहे. ही मुलगी दिल्ली युनिवर्सिटीतील दौलत राम कॉलेजची विद्यार्थीनी आहे. जेएनयू हल्ल्याप्रकरणी या मुलीला नोटीस पाठवून तिची चौकशी करण्यात येणार आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसली होती मुलगी
जेएनयू हॉस्टेलमध्ये घुसून ज्या मास्कधारी हल्लेखोरांनी धुमाकूळ घातला होता. त्यांच्यामध्ये चेक्स शर्ट घातलेली एक मुलगीदेखील होती. या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती मुलगी इतर मास्कधारी हल्लेखोरांसोबत दिसली होती. संबंधित प्रकरणातील ओळख पटलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी काहींना नोटीस देऊन क्राईम ब्रान्चने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
पाहा व्हिडीओ : जेएनयू हिंसाचारामागे डाव्या विद्यार्थी संघटनेचा हात, दिल्ली पोलीसांचा आरोप
दिल्ली पोलिसांनी संशयितांचे फोटो केले जारी
दरम्यान, जेएनयू हिंसा प्रकरणी दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रान्च तपास करत आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन नऊ संशयितांचे फोटो जारी केले होते. ज्यामध्ये पंकज मिश्रा, आईशी घोष (जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष), वास्कर विजय, सुचेता तालुकदार, चुनचुन, कुमार, डोलन सामंता, प्रिया रंजन, योगेंद्र भारद्वाज आणि विकास पटेल यांच्या नावांचा समावेश होता. योगेंद्र भारद्वाज यूनिटी अगेंस्ट या व्हॉट्स अॅप ग्रुपचे अॅडमिन आहेत. यांपैकी दोन संशयित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आणि इतर सात जण डाव्या संघटनांशी निगडीत आहेत.
5 जानेवारीला हॉस्टेलमध्ये हिंसाचार
जेएनयूच्या तीन हॉस्टेलमध्ये 5 जानेवारीच्या संध्याकाळी जोरदार राडा झाला. अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली तसेच तोडफोडही केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषवरही हल्ला करण्यात आला. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोरांना आतापर्यंत पकडलेलं नाही. पण मास्कधारी हल्लेखोरावर जोरदार राजकारण सुरु झालं आहे. हल्ल्यानंतर साबरमती हॉस्टेलच्या दोन वार्डनने राजीनामा दिला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकलो नाही, असं सांगत राम अवतार मीणा आणि प्रकाश साहू यांनी राजीनामा दिला.
पाहा व्हिडीओ : जेएनयू हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून सर्विस, युटिलिटी शुल्क घेणार नाही : प्रशासन
जेएनयूमध्ये मास्कधारी हल्लेखोरांचा धुमाकूळ
जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. हातात लाठ्या-काठ्या, रॉड, हॉकी स्टिक, दगड घेऊन मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. सुमारे पाच तास हा राडा सुरु होता. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला झाला. डोकं, हात, पायाच्या गंभीर जखमांसह दोन डझनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. अभाविपने हल्ला केल्याचा आरोप डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी केला. तर अभाविपने डाव्या संघटनांवर आरोप केला.
संबंधित बातम्या :
JNU Attack | हल्ल्यात जखमी झालेली जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष कोण आहे?
JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषसह 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा
JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?
जेएनयूत रविवारी रात्र काय झालं? मास्कधारी गुंडांचा मुलींच्या वसतीगृहात हैदोस