Congress : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीरच्या 64 नेत्यांचा राजीनामा
64 J&K Leaders Resigned Congress: काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या या सर्व 64 नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
64 J&K Leaders Resigned Congress : काँग्रेस (Congress) पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) 64 नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तारा चंद यांच्याशिवाय माजी मंत्री माजीद वाणी, डॉ मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा ही नावे आहेत.
गुलाम नबी आझाद यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय
काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या या सर्व 64 नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एकत्रित राजीनामे सादर केले आहेत.
काँग्रेसला आणखी धक्के बसतील : गुलाब नबी आझाद
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या राजीनाम्यावर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया आली आहे. आझाद म्हणाले, "सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील."
गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्ष सोडला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेससोबतचा पाच दशकांचा संबंध संपवला. राहुल गांधींनी पक्षाची संपूर्ण सल्लागार यंत्रणा "उध्वस्त" केल्याबद्दल निंदा केली. ते लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरू करणार आहेत. अनेक माजी मंत्री आणि आमदारांसह अनेक प्रमुख काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थेचे (पीआरआय) शेकडो सदस्य, नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांनी आधीच काँग्रेस सोडून आझाद यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
काँग्रेसची अवस्था बिकट
काँग्रेसची अवस्था सध्या वाईट झाली आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे, मात्र त्याआधीच सर्व मोठे चेहरे काँग्रेसमधून राजीनामे देत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. अंतर्गत कलहामुळे काँग्रेसची लूट होताना दिसत आहे.