Ebrahim Raisi Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्र्यांचा हेलिकाॅप्टर अपघातात मृत्यू; हेलिकाॅप्टरचे अवशेष सापडले
इराणचे राष्ट्रअध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. एका जंगलात हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तेहराण : इराणचे राष्ट्रअध्यक्ष इब्राहीम रईसी (Ebrahim Raisi) यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा युद्धपातळीवर शोध घेतला जात होता. आता शोधमोहिमेत हे हेलिकॉप्टर सापडले असून त्याचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, या अपघातात आता रईसी यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
दाट धुके, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात (Ebrahim Raisi Helicopter Crash Update)
मिळालेल्या माहितीनुसार इराणचे राष्ट्रअध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरमधून (Ebrahim Raisi Helicopter Crash) प्रवास करत होते. मात्र पूर्व अजरबैजानमध्ये जंगलात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघातग्रस्त प्रदेश जबरीजपासून साधारण 100 किमीच्या अंतरावर आहे. प्रवासादरम्यान खराब हवामान आणि घनदाट धुक्यामुळे रईसी यांच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आणि रईसी यांचे यात निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
राज्यकारभारावर परिणाम पडणार नाही
इराणमधील एका वृत्तवाहिनीने या हेलिकॉप्ट क्रॅशबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरची स्थिती पाहता या अपघातात प्रवाशी बचावण्याची शक्यता कमी आहे, असे या टीव्हीने म्हटले आहे. तर दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी या अपघाताचा देशाच्या कारभारावर परिणाम पडणार नाही, असे म्हणत नागरिकांना धीर दिला आहे.
हेलिकॉप्टरमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री
रईसी यांच्यासह परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दुल्लाहिआन हेदेखील या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र या दुर्घटनेत कोणताही प्रवासी बचावण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात असल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अपघातानंतर चिंता व्यक्त करत रईसी यांच्यासाठी प्रार्थना केली होती. :
हेही वाचा :
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच