infosys prize 2023 : बंगळूरुमध्ये इन्फोसिस प्राइज 2023 चं आयोजन, वैज्ञानिक संशोधनाचा गौरव
infosys prize 2023 : मुंबईतील भार्गव भट यांना मॅथमॅटिकल सायन्स या विषयातील उत्कृष्ट कामगिरीसाठी इन्फोसिस प्राइज 2023 ने गौरवण्यात आले आहे.
बंगळूरु : इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन (infosys prize 2023) तर्फे आज बेंगळुरुमध्ये (Banglore) झालेल्या सोहळ्यात इन्फोसिस प्राइज 2023 च्या विजेत्यांना गौरवण्यात आले. करिअरच्या मध्यावर असलेल्या संशोधकांनी विविध विषयांमध्ये केलेले काम आणि वैज्ञानिक संशोधनाचा गौरव करण्यासाठी इन्फोसिस प्राइजतर्फे मागील 15 वर्षांपासून भारतातील संशोधकांना सन्मानित करण्यात येते. इंजिनीअरिंग अॅण्ड कम्प्युटर सायन्स, ह्युमॅनिटीज, लाईफ सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस अशा सहा क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीसाठी विजेत्यांना हे पुरस्कार दिले जातात.
नोबेल पुरस्कार विजेते, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे नावाजलेले प्राध्यापक आणि माजी कुलगुरू प्रा. ब्रायन श्मिट यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. सुवर्णपदक, प्रमाणपत्र आणि 1,00,000 डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. जगभरातील ख्यातनाम वैज्ञानिक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, आघाडीचे व्यावसायिक, तरुण संशोधक आणि विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते. इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचे विश्वस्त क्रिस गोपालकृष्णन ,नारायण मूर्ती, श्रीनाथ बाटनी, के. दिनेश, नंदन निलकेणी, मोहनदास पै,सलिल पारेख, एस.डी. शिबुलाल या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची संधी म्हणजे माझा सन्मान
ब्रायन श्मिट यावेळी म्हणाले की, यंदा इन्फोसिस प्राइज सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची संधी म्हणजे मी सन्मान समजतो. आपल्या संशोधनातून भारतीय संशोधक विविध ज्ञानशाखा पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या या लक्षणीय कार्यावर या सोहळ्यात प्रकाशझोत टाकला गेला. विविध शैक्षणिक विषयातील हे पुरस्कार विजेते संशोधनाच्या जगतात आघाडीवर आहेत आणि त्यांचे हे संशोधन कार्य मानवतेच्या हितात परवर्तित होत आहे. यंदाच्या या सोहळ्यात आपण अशाच काही सर्वाधिक लक्षणीय कार्यांचा गौरव करत असताना इथे उपस्थित राहण्याची संधी मिळणे, हा मी सन्मान समजतो.
ही काळाजी गरज - क्रिस गोपालकृष्णन
विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीचे महत्त्व सांगताना इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन म्हणाले की, मागील 15 वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधनावर भर देत आहे आणि भविष्यातील पिढ्यांना विज्ञानात करिअर करण्याची प्रेरणा देतोय. वैज्ञानिक संशोधनाला चर्चेच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे आणि देशातील वैज्ञानिक वातावरण सातत्याने अधिकाधिक बळकट होईल यासाठी आपण सगळ्यांनी सुयोग्य प्रयत्न करण्याचीही गरज आहे.
224 नामांकनामधून विजेत्यांची निवड
परीक्षक मंडळाने 224 नामांकनांमधून विजेत्यांची निवड केली आहे. शिक्षणक्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींचा या मंडळात समावेश होता. इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्ससाठी प्राध्यापक अरविंद (मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), ह्युमॅनिटीजसाठी प्राध्यापक अकील बिलग्रामी (कोलंबिया युनिव्हर्सिटी), लाईफ सायन्सेसाठी प्राध्यापक मृगंका सूर (मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), मॅथमेटिकल सायन्सेससाठी प्राध्यापक चंद्रशेखर खरे (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस), फिजिकल सायन्सेससाठी प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि सोशल सायन्सेससाठी प्राध्यापक कौशिक बसू (कॉर्नेल युनिव्हर्सिटी) यांचा समावेश होता.
इन्फोसिस प्राइज 2023 साठीचे सहा विभागातील विजेते
इंजिनीअरिंग अॅण्ड कम्प्युटर सायन्स
इंजिनीअरिंग अॅण्ड कम्प्युटर सायन्ससाठीचा इन्फोसिस प्राइज 2023 पुरस्कार आयआयटी कानपूरचे सस्टेनेबल एनर्जी इंजिनीअरिंग (एसईई)चे प्राध्यापक सच्चिदानंद त्रिपाठी यांना देण्यात आला. परिणामकारक पद्धतीने हवेचा दर्जा तपासणे आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या साह्याने प्रदुषणाची हायपर लोकल पातळी मोजणे, डेटा गोळा करणे आणि माहितीचे पृथ्थकरण यासाठी मोठ्या सेन्सर्सवर चालणारी हवेचा दर्जा तपासणारी फिरती प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे.
ह्युमॅनिटीज
ह्युमॅनिटीज विभागातील इन्फोसिस प्राइज 2023 सायन्स गॅलरी बेंगळुरुच्या संस्थापक संचालक जान्हवी फाळके यांना देण्यात आले. आधुनिक भारतातील वैज्ञानिक संशोधनातील व्यक्ती, संस्था आणि वस्तूंच्या इतिहासाबद्दल त्यांनी अत्यंत भव्य आणि अप्रतिम अशी मांडणी केली आहे. द अॅटोमिक स्टेट या पुस्तकात त्यांनी भारतातील दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा संपन्न आणि विविध पातळ्यांवरील इतिहास मांडताना विज्ञानाचा विशेषत: अणूविज्ञानाचा जागतिक इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरच्या देशातील मानववंशशास्त्राची अप्रतिम गुंफण केली आहे.
लाईफ सायन्सेस
लाईफ सायन्सेससाठी आयआयटी कानपूरचे बायोलॉजिकल सायन्सेस अॅण्ड बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक अरुण कुमार शुक्ला यांना इन्फोसिस प्राइज 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जी-प्रोटीन कपल्ड रिसेप्टर (GPCR) जीवशास्त्र या विषयातील त्यांच्या भव्य आणि अप्रतिम संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. औषधांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या जीपीसीआरचा एक नवा दृष्टिकोन प्राध्यापक शुक्ला यांच्या संशोधनातून मांडण्यात आला आहे. कमीतकमी साईड इफेक्ट्स मात्र उत्तम परिणाम साधणाऱ्या उपचारांच्या निर्मितीत आजवर अस्पर्शित राहिलेल्या संधी त्यांच्या या संशोधनामुळे खुल्या झाल्या आहेत.
मॅथमॅटिकल सायन्सेस
इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स स्टडी आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतील भार्गव भट, फर्नहोल्झ जॉईंट प्रोफेसर यांना मॅथमॅटिकल सायन्सेससाठीचे इन्फोसिस प्राइझ 2023 प्रदान करण्यात आले. अरिथमॅटिक जॉमेट्री आणि कम्युटिव्ह अल्जिब्रा या विषयात त्यांनी मूलभूत स्वरुपाचे अप्रतिम संशोधन केले आहे. जर्मन गणितज्ज्ञ पीटर शोल्झ यांच्यासोबत प्रीस्मॅटिक कोहोमोलॉजीमध्ये त्यांनी प्युअर मॅथमॅटिक्समधील काही नव्या संकल्पना आणि दमदार पद्धती आणल्या आहेत.
फिजिकल सायन्सेस
फिजिकल सायन्सेसमधील इन्फोसिस प्राइज 2023 नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमधील बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स आणि बायोइन्फॉर्मेटिक्सचे प्राध्यापक मुकुंद थत्तई यांना प्रदान करण्यात आला. पेशीय जीवशास्त्रात त्यांनी केलेले संशोधन क्रांतीकारी ठरले आहे. प्राध्यापक थत्तई फिजिस्ट आहेत आणि सुक्ष्म विकारांमधून (मायक्रोस्कोपिक डिसऑर्डर) कशाप्रकारे गुंतागुंतीची पेशीय रचना तयार होते यावर ते संशोधन करत आहेत.
सोशल सायन्सेस
सोशल सायन्सेससाठीचे इन्फोसिस प्राइज 2023 कोलंबिया युनिव्हर्सिटीतील पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापक करुणा मंटेना यांना प्रदान करण्यात आले. ब्रिटीश सत्तेच्या संदर्भात त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. सध्याची आधुनिक सामाजिक विचारसरणी निर्माण होण्यात याआधीच्या साम्राज्यवादी विचारसरणीचा महत्त्वाचा वाटा आहे, असे संशोधन त्यांनी मांडले आहे.