Shivangi Swaroop | भारतीय नौदलाला मिळाली पहिला महिला पायलट
शिवांगी स्वरूप भारतीय नौदलात पहिली महिला पायलट म्हणून रुजू झाली आहे. शिवांगी यांची पायलट म्हणून कोच्चीतील नौदलाच्या दक्षिण विभागात नियुक्ती करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहेत. भारतीय नौदलात आज नवा इतिहास घडला आहे. दीड वर्षांच्या सरावानंतर सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप नौदलात पहिली महिला पायलट म्हणून रुजू झाली आहे. शिवांगीची पायलट म्हणून कोच्चीतील नौदलाच्या दक्षिण विभागात नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या 4 डिसेंबरला नौदलाच्या स्थापनादिनी शिवांगी नौदलाचं टोही विमान, डोरनियर उडवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नौदलाच्या परंपरेनुसार शिवांगीसह इतर दोन पुरुष पायलट्सना 'विंग्ज' देण्यात आले. मी नौदलाची पहिली महिला पायलट असेन, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. लहानपणापासून हेलिकॉप्टर उडवण्याची माझी इच्छा होती. इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर नौदलात जाण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मी नौदलात सामील झाले, असं शिवांगीने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.
बिहारच्या मुजफ्फरपूरच्या राहणाऱ्या शिवांगीने मनिपाल विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवांगीने नौदलाचा शॉर्ट सर्विस कमिशनचा (एसएससी) 27 वा एनओसी कोर्स केला आणि गेल्या वर्षी जून 2018 मध्ये केरळमधील एझिमालामधील इंडियन नेव्हल अॅकॅडमीमध्ये आपलं कमिशनिंग पूर्ण केलं. जवळपास दीड वर्ष पायलटची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली आहे.
भारतीय नौदलातल्या एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागात अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ‘ऑब्जर्व्हर’ म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात. मात्र नौदलात आता महिलांना कॉम्बॅट रोलही जवळपास देण्यात आला आहे. कारण शिवांगीला अँटी सबमरिन एअरक्राफ्टवरही तैनात केलं जाणार आहे, अशी माहिती दक्षिण क्षेत्राचे कमांड इन चीफ, वाईस अॅडमिरल ए के चावला यांनी दिली.