Indian Coast Guard Day : आज इंडियन कोस्ट गार्ड दिन, भारतीय तटरक्षक दलाचा पराक्रमी इतिहास जाणून घ्या...
Indian Coast Guard Day : आज एक फेब्रुवारी रोजी देशात इंडियन कोस्ट गार्ड दिन साजरा केला जातोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
Indian Coast Guard Day 2023 : आज एक फेब्रुवारी रोजी देशात इंडियन कोस्ट गार्ड दिन साजरा केला जातोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. इंडियन कोस्ट गार्ड दिन (ICG) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे. 1978 साली, 18 ऑगस्ट रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी म्हणजेच 1977 मध्ये 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो.
Greetings to all Coast Guard personnel on their Raising Day. The Indian Coast Guard is known for its professionalism and efforts to keep our coasts safe. I also convey my best wishes to them for their future endeavours. @IndiaCoastGuard pic.twitter.com/K1iahYMj8G
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2023
भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेलं लष्करी दल
सागरी तटरक्षक दल म्हणजेच (Indian Coast Guard Day) भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेलं लष्करी दल. या तटरक्षक दलाचे मुख्य कार्य म्हणजे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित असे काही आढळले तर त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करणे असे आहे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून, त्यांची मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, आणि गांधीनगर येथे आहेत. ही चार प्रादेशिक मुख्यालये भारताच्या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर अकरा जिल्हा तटरक्षक दल व सहा तटरक्षक स्थानकांमार्फत काम करतात. भारतीय सागरी तटरक्षक दलाचे बोधवाक्य हे ‘वयम् रक्षमः’असे आहे. याचाच अर्थ "आम्ही संरक्षण करतो" असा आहे.
जाणून घ्या तटरक्षक दलाची कर्तव्ये :
- समुद्रावरील जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणे.
- किनाऱ्यापासून सागरी सीमेपर्यंत गस्त घालणे.
- स्वकीय मच्छीमारांना संरक्षण देणे आणि परकीय मच्छीमारांचा अटकाव करणे.
- संशयास्पद जहाजे तपासणे तसेच दुर्घटनाग्रस्त जहाजांना मदत करून लोकांचे प्राण आणि संपत्तीचा बचाव करणे.
- किनाऱ्यावरील जहाजातून तेलगळती होत असल्यास समुद्रातील मासे आणि इतर जलचरांना वाचविणे.
- समुद्रात विमान दुर्घटना झाल्यास मदत करणे.
- प्रदूषणामुळे धोक्यात आलेल्या वनस्पतींचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखणे.
- चोरट्या आयात-निर्यातीवर देखरेख ठेवून सीमाशुल्क आकारणे.
- सागरी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यावर गुन्हा दाखल करणे.
भारताचा सागरी किनारा सुमारे 7,517 किमी. आहे. या किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी तटरक्षक दलावर आहे. यासाठी शेजारील देशांशी असलेल्या संबंधांवर तटरक्षक दलाची करडी नजर असते. भाभा अणुसंशोधन केंद्र, गुजरातमधील आण्विक भट्टी, लहान-मोठी बंदरे, खनिज पदार्थ, ॲल्युमिनियम भट्ट्या, नाविक तळ, विमानतळ इ. संवेदनक्षम स्थळे किनारपट्टीवर आहेत. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी तटरक्षक दलावर तर आहेच. त्याचप्रमाणे सागरी वादळे किंवा त्सुनामी लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्या संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याचीही महत्वपूर्ण जबाबदारी तटरक्षक दलावर आहे.