Indian Citizenship : पाच वर्षात सहा लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडलं, सरकारची संसदेत माहिती
Indian Citizenship : गेल्या पाच वर्षांच्या काळात सहा लाखाहून अधिक नागरिकांनी आपल्या भारतीयत्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
नवी दिल्ली : भारतीय नागरिकांबद्दल एक आश्चर्यकारक माहिती समोर आली असून गेल्या पाच वर्षात तब्बल सहा लाख भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याचं समोर आलं आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत केवळ 4,177 लोकांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे.
भारतीय नागरिकत्वाचा त्याग आणि त्याचा स्वीकार करणाऱ्या नागरिकांची आकडेवारी आज केंद्र सरकारने संसदेत सादर केली. त्यामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार, एक कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत.
गेल्या पाच वर्षात त्याग केलेल्या नागरिकांची संख्या
संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी स्वरुपात उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं की, 2017 साली एक लाख 33 हजार 049 नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला. त्यानंतर 2018 साली 1,34,561 नागरिकांनी, वर्ष 2019 मध्ये 1,44,017 नागरिकांनी, वर्ष 2020 मध्ये 85,248 नागरिकांनी आणि 30 सितंबर 2021 पर्यंत 1,11,287 नागरिकांनी त्यांच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला.
10,645 लोकांची नागरिकत्वासाठी विनंती
केंद्रीय गृह राज्यमंत्रींनी मंगळवारी लोकसभेत सांगितलं की गेल्या पाच वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी विनंती केली आहे. त्यामध्ये 4177 नागरिकांचा विनंती अर्ज मान्य करण्यात आला असून त्यांना नागरिकत्व प्रदान करण्यात आलं आहे. त्यामधील 227 अमेरिकेचे, 7782 पाकिस्तानचे, 795 अफगानिस्तानचे आणि 184 बांग्लादेशचे नागरिक आहेत.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं की, 2016 साली 1106 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं होतं. तसेच 2017 साली 628, 2018 साली 628 , 2019 साली 987 आणि 2020 साली 639 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :