'हा इंडियन सीईओ व्हायरस, यावर लस नाही'; पराग अग्रवाल यांच्यावर आनंद महिंद्रांची स्तुतीसुमनं
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. इलॉन मस्कनंतर आता भारतीय उद्योगपतींनीही पराग अग्रवाल यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. हा भारतीय सीईओ व्हायरस असून यावर जगभरात कोणतीही लस नाही असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.
गुगलच्या सीईओपदी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहेत. सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी आहेत. भारतीय वंशाचे शंतनू नारायण सध्या अॅडोबे या कंपनीच्या सीईओपदी आहेत. त्यात आता भर पडली असून भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीतील भारतीयांचा दबदबा वाढला आहे. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून ते म्हणतात की, "हा एक प्रकारचा पॅन्डेमिक आहे आणि भारतीय वंशाचं असल्याचा आम्हाला आनंद वाटतोय. हा भारतीय सीईओ व्हायरस असून यावर कुठेही लस सापडणार नाही."
This is one pandemic that we are happy & proud to say originated in India. It’s the Indian CEO Virus… No vaccine against it. 😊 https://t.co/Dl28r7nu0u
— anand mahindra (@anandmahindra) November 29, 2021
त्या आधी टेस्लाच्या इलॉन मस्क यांनीही ट्वीट केलं असून ते म्हणाले की, भारतीय कौशल्याचा फायदा हा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात झाला आहे.
आयआयटी मुंबईतून पराग अग्रवाल यांचं शिक्षण झाले आहे. ट्विटरशिवाय त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे. 2011 मध्ये पराग यांनी ट्विटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. केवळ 10 वर्षांत पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी निवड झाली आहे.
संबंधित बातम्या :