अंबाला विमान दुर्घटना कशी टळली? वायूसेनेनं जारी केला व्हिडीओ
विमानाची एक टाकी अंबाला एअरबेस जवळील रहिवाशी परिसरात पडली. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
नवी दिल्ली : हरयाणातील अंबालामध्ये काल हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमानाला पक्ष्याने धडक दिली होती. त्यामुळे विमानाचं एक इंजिन बंद पडलं होतं. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत अतिरिक्त असलेल्या इंधनाच्या टाक्या खाली सोडून दिल्या. पायलटच्या या निर्णयामुळेच विमानाचं सुरक्षित लँडिंग शक्य झालं. या घटनेचा व्हिडीओ भारतीय हवाई दलाने प्रसारित केला आहे.
विमानाच्या इंधनाच्या टाक्या जमिनीवर आदळल्यानंतर त्याचा मोठा स्फोट झाला आणि त्याच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावल्या. इंजिन बंद झाल्यानंतर पायलटसमोर दोन पर्याय शिल्लक होते. एक म्हणजे विमान लॅन्ड करणे किंवा विमानावरील वजन कमी करणे. महत्वाची बाब म्हणजे हा निर्णय अगदी काही सेकंदात घेणं गरजेचं होतं. त्यावेळी पायलटने प्रसंगावधान राखत इंधनाच्या टाक्या सोडून दिल्या.विमानाची एक टाकी अंबाला एअरबेस जवळील रहिवाशी परिसरात पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारात हे लढाऊ विमान प्रशिक्षण अभियानासाठी निघालं होतं.
वायूसेनेच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटने या घटनेदरम्यान प्रसंगावधान दाखवलं आहे. अशावेळी विमानाला जोडलेली बाहेरील एखादी वस्तू खाली सोडून विमानावरील वजन करणे गरजेचं असतं. त्यामुळे पायलट एका इंजिनच्या साह्याने सुरक्षितरित्या विमान खाली उतरवण्यात यशस्वी झाला.