Malkhan Singh: 1968 साली विमान कोसळलं, तब्बल 56 वर्षांनी बर्फात सापडला मृतदेह, भारताचे वीर जवान मलखान सिंह कोण?
Indian Army Jawan body found after 56 years: मलखान सिंह यांचा मृतदेह 56 वर्षे बर्फात दफन होता. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या गावात शोकाकुल वातावरण होते.
लखनऊ: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय लष्कराने कायमच प्राणप्रणाने वेळोवेळी देशाचे संरक्षण केले आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावताना आजवर अनेक लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांनी हौतात्म्य पत्कारले आहे. त्यांच्या बलिदानाच्या आणि शौर्याच्या कहाण्या आजही अभिमानाने सांगितल्या जातात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. 56 वर्षांपूर्वी सियाचीन ग्लेशिअरच्या परिसरात भारतीय वायूदलाचे (Indian Air force) एक विमान कोसळले होते. या विमानाचा वैमानिक मलखान सिंह (Malkhan singh) यांचा त्यावेळी मृत्यू झाला होता. मात्र, त्यावेळी त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. परंतु, आता 56 वर्षांनी मलखान सिंह यांचा बर्फात दफन असलेला मृतदेह सापडला आहे. मलखान सिंह यांच्या गणवेशावर असलेल्या बॅचवरुन त्यांची ओळख पटवण्यात आली.
हा मृतदेह मलखान सिंह यांचा असल्याचे समजल्यानंतर भारतीय लष्कराने हुतात्मा झालेल्या जवानाला ज्याप्रमाणे निरोप दिला जातो, त्याच थाटात मलखान सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मलखान सिंह यांच्या पार्थिवाचे अवशेष उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील त्यांच्या गावी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सगळ्यांच्या उपस्थितीत मलखान सिंह यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग मलखान सिंह यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत भावूक करणारा होता. गेल्या 56 वर्षांपासून मलखान सिंह यांचे नेमके काय झाले, याबाबत कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती. 56 वर्षांनी त्यांचा मृतदेह मूळगावी आणण्यात आला तेव्हा त्यांचे वंशज आणि नातेवाईक भावूक होताना दिसले.
कोण होते मलखान सिंह?
मलखान सिंह यांचा जन्म 18 जानेवारी 1945 रोजी सहारनपूर जिल्ह्यातील फतेहपूर या गावात झाला होता. ते भारतीय वायूदलात वैमानिक होते. 7 फेब्रुवारी 1968 रोजी चंदिगढ विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर रोहतांग परिसरात त्यांचे विमान कोसळले होते. या विमानात 102 भारतीय जवान होते. या विमानाचे अवशेष 2003 साली सापडले होते. या अपघातात विमानातील सर्व जवानांचा मृत्यू झाला होता. तेव्हा मलखान सिंह यांच्यासह कोणत्याही जवानाचा मृतदेह सापडला नव्हता. मात्र, 56 वर्षांनी मलखान सिंह यांचा मृतदेह मिळाला, त्यांच्या गणवेशावर असलेल्या बॅचवरुन त्यांची ओळख पटली. भारतीय लष्करातील डोगरा स्काऊटस या तुकडीकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शोधकार्य सुरु होते. यावेळी त्यांना मलखान सिंह यांचा मृतदेह सापडला.
पत्नीचं लहान भावासोबत लग्न
मलखान सिंह यांच्या मृतदेहाचे अवशेष 56 वर्षांनी त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षे त्यांची वाट पाहिली. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. हा अपघात झाला तेव्हा शीलावती या गर्भवती होत्या. काही वर्षांनी त्यांची पत्नी शीलावती यांनी मलखान सिंह यांचा लहान भाऊ चंद्रपाल सिंह यांच्याशी विवाह केला. भारतीय वायूदलाने मलखान सिंह यांना मृत घोषित केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी कधीच पितृपक्षात त्यांचे श्राद्ध घातले नव्हते. आता 56 वर्षांनी त्यांचा मृतदेह मूळगावी आणण्यात आला. मात्र, त्यांचे आई-वडील, पत्नी आणि मुलगा रामप्रसाद यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा